मासिक सभेत मालमत्ता कर वाढीचा प्रस्तावाला सेनेचा कडाडून विरोध
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या अॅडव्हेंचर पार्कच्या ठरावाला वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आली तसेच मालमत्ता कराच्या भांडवली मूल्यावर आधारीत कराचा दर निर्धारीत करण्याच्या विषयासह विविध दहा विषयांची मंजुरी मासिक सभेत देण्यात आली. दरम्यान, मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सेनेच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला.
शिवसेनेचा मालमत्ता कर वाढीला विरोध
मुक्ताईनगर नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष नजमा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या अजेंड्यावर 10 विषय होते. त्यापैकी मालमत्ता कराच्या भांडवली मूल्यावर आधारीत कराचा दर निर्धारित करण्याबाबत चर्चा करण्यात आला तर दरवाढीच्या प्रस्तावाला सत्ताधार्यांनी मंजुरी दिली असलीतरी शिवसेनेच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आधी जनतेला नागरी सोयी-सुविधा पुरवा व त्यानंतर कर वाढ करा, अशी भूमिका मांडली मात्र पंचवार्षिक कायद्यानुसार ही वाढ करणे आवश्यक असल्याने या विषयाला मंजुरी देण्यात आली.
यांची होती सभेला उपस्थिती
उपनगराध्यक्ष मनीषा प्रवीण पाटील, नगरसेवक संतोष कोळी, पियुष मोरे, मुकेश वानखेडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. मालमत्ता कराच्या भांडवली मूल्यावर आधारीत कराचा दर वाढविण्यास आपला विरोध असून जोपर्यंत नागरीकांना सोयी-सुविधा मिळत नाही तोपर्यंत कर वाढवण्यात येऊ नये,अशी सूचना शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे तसेच नगरसेवक संतोष मराठे व सविता भलभले यांनी मांडली.