चौकशीसाठी काँग्रेसतर्फे पंचायत समितीसमोर उपोषण
मुक्ताईनगर:– ग्रामपंचायत जकात अनुदानाचा निधी तसेच कर वसुलीमधील रकमेचा झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी होवून संबंधीतावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेसतर्फे सोमवारासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मुक्ताईनगर ग्रामपंचायतीला एप्रिल 2017 ते 11 ऑक्टोबर 2017 पर्यत 35 ते 40 लाख रुपये कर वसुलीतुन तसेच जुलै, ऑगस्ट मध्ये आठ लाख, 9 ऑक्टोबर 2017 रोजी 30 लाख 10 हजार असे अनुदान ग्रामपंचायतीला प्राप्त झाले मात्र या रकमेतून गावात कुठलाही विकास साधण्यात आला नाही. जागो-जागी कचर्याचे ढीग, घाणीचे साम्राज्य असून सर्वत्र तुंबलेल्या गटारी तसेच वाढलेली काटेरी झुडपे व डासांच्या साम्राज्याने रोगराई फैलावण्याची भीती आहे. मुक्ताईनगर ग्रामपंचायत याबाबत काहीही उपाय योजना करतांना दिसून येत नसल्याचा आरोप उपोषणार्थींनी केला आहे. भ्रष्टाचारासंदर्भात 16 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पार्टीने तक्रार अर्ज दिला असून दखल घेण्यात आली नसल्याचेही नमूद करण्यात आले.
यांचा उपोषणात सहभाग
उपोषणात काँग्रेस अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्यासह डॉ.जगदीश पाटील, अॅड. अरविंद गोसावी, बी.डी.गवई, तालुका सचिव, प्रभाकर चौधरी, जिल्हा सचिव असीअ खान, शहराध्यक्ष आलम शाह, मारोती सुरळकर, सहचिटणीस आर.के.गणेश, माजी युवक अध्यक्ष, अतुल जावरे, तालुका सरचिटणीस अनिल सोनवणे, तालुका संघटक अरुण कांडेलकर, तालुका उपाध्यक्ष शकील आझाद, फिरोज खान, सैय्यद वाहेद, महेंद्र बोदडे आदी सहभागी झाले आहेत.