मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या सातत्याने वाढत असून प्रादुर्भाव वाढतच असल्याने रुग्ण आणि क्वारंटाइन केलेले रुग्ण यांना ठेवण्यासाठी प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह आणि आदिवासी मुलांचे वसतीगृह कोविड सेंटर म्हणुन अधिग्रहित केले होते परंतु दररोज रुग्ण संख्या वाढत असल्या कारणाने व्यवस्था अपूर्ण पडत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जी.जी.खडसे महाविद्यालयातील मुलींचे हॉस्टेल कोविड सेंटरला देण्याबाबत तहसीलदारांना सूचना केल्यानंतर तालुका प्रशासनाने खडसे महाविद्यालयातील मुलींचे हॉस्टेल कोविड सेंटर म्हणुन अधिग्रहीत केले आहे.
200 रुग्णांची व्यवस्था
मुलींच्या वस्तीगृहात जवळपास 200 रुग्णांची व्यवस्था झाली आहे. यासाठी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने वसतीगृह आणि पलंग कोविड सेंटरला उपलब्ध करून दिले आहेत. सुरू झालेल्या या कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिलेले हे वस्तीगृह उंच टेकडीवर असल्या कारणाने पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी नैसर्गिक हवा रुणांना मिळणार आहे. संस्थेची स्व-मालकीची वसतिगृहाची इमारत स्वतः पुढाकार घेऊन कोविड सेंटरला उपलब्ध करून दिल्याबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर यांचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.