शिवसेना महिला आघाडीचा आरोप ; एकीकडे नागरी समस्या तर दुसरीकडे निधीचा अपव्यय
मुक्ताईनगर- शहरात रस्ते, गटारींसह पथदिव्यांची समस्या बिकट बनली असून व्यापारी संकुलांअभावी टपरी धारक बनलेले शहर व कालबाह्य जलशुद्धीकरण केंद्रातुन होणारा पाणीपुरवठा आदी भयंकर समस्या भेडसावत असतांना नगरपंचायतीद्वारा निधी नसल्याची ओरड केली जात असताना दुसरीकडे प्रभाग 13 , 15 व 17 मध्ये मोकळ्या भुखंडावर सुशोभिकरणाच्या नावाखाली सव्वादोन कोटी रुपये खर्च करण्याचा नगरपंचायतीने घाट रचला आहे. नागरीकांच्या दृष्टीने मुलभुत सुविधांकडे कानाडोळा करण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप करीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात येवून नागरी समस्यांना प्राधान्य देत विकासकामे करण्याची मागणी करण्यात आली असून मुख्याधिकारी शाम गोसावी व नगराध्यक्षा नजमा तडवी यांना निवेदन देण्यात आले.
नागरी समस्येवर निधी खर्च न केल्यास आंदोलन
महिला आघाडीतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 5 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष नजमा तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात काही ठिकाणी दोन कोटी 25 लाख रुपये खर्चाचे बाग-बगीचांचे सुशोभीकरण होणार असल्याचे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. शहराचे सुशोभीकरण होणे ही अभिनंदनीय बाब आहे मात्र आज रोजी शहरात कालबाह्य जलशुद्धीकरण केंद्रातुन पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. शहरातील रहिवासी नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणावर कररुपी निधी देतात अशा नागरीकांना रस्ते व गटारी दिवा बत्तीची तीव्र समस्या भेडसावत आहे. त्यातच शहरात असंख्य टपरीधारक रस्त्यावरच हातगाड्या व टपर्या थाटुन उदर निर्वाह करतात अशा लोकांसाठी भरीव व्यापारी संकुलांची आवश्यकता आहे. त्यातच ग्रामपंचायत कार्यकाळात जुन्या तलाठी कार्यालयाच्या जागेवर 50 लाख रुपये कर्जाने व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू झाले होते मात्र हे काम सुद्धा अपुर्णावस्थेत आहे मात्र 50 लाख रुपये कर्जाचे व्याज दरदिवसाला सुरुच आहे तसेच 1999 पासुन ते 2017 पर्यंत सत्ता भोगणार्या तत्कालील सत्ताधारी व ग्रामपंचायत प्रशासकाने पाणीपुरवठा व पथदिव्यांचे वीज बिले थकविल्याने ही रक्कम कोटींच्या घरात थकली व वीज वितरण कंपनीद्वारा वारंवार वीजपुरवठा खंडीत करण्याची नामुष्कीदेखील नगरपंचायतीवर ओढविली आहे. इतक्या भयंकर गंभीर समस्यांनी शहरवासी त्रस्त असतांना केवळ भूखंड सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली दोन कोटी 25 लाखासारखी महत्वाची रक्कम वायफळ घालविण्याचा नगरपंचायतीचा डाव असून नागरीकांच्या प्राथमिक गरजा पुर्ण करण्याकडे आपला कल दिसुन येत नाही. त्यातच तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची चिन्हे असून याबाबत देखील आपले प्रशासन उदासीन दिसुन येत आहे. हा निधी वळविण्यात येवून शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते, गटारी व पिण्याच्या समस्येसह व्यापारी वर्गाची वृद्धी होईल या अनुषंगाने खर्च करण्यात यावा अन्यथा शिवसेना महिला आघाडीतर्फे नागरीकांच्या सहभागाने प्रचंड आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे-शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक यशोदा माळी, तालुका समन्वयक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई, शोभा मोरे यांच्यासह शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, रोहिदास शिरसाठ, शुभम तळेले, चेतन पाटील आदींसह असंख्य शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या.