पाणीटंचाई आढावा बैठकीत माजी मंत्री एकनाथराव खडसेंकडून अधिकार्यांची कानउघाडणी
मुक्ताईनगर- ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराबद्दल माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी उपविभागीय अभियंता व उपअभियंता यांची कानउघाडणी करीत त्यांना चांगलेच फैलावर घेतले तसेच तालुक्यातील लालगोटा ,पारंबी, उमरे, मन्यारखेडा, व पिंपरी अकरावूत या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत ग्रामसेवकाकडून खुलासा मागवण्याच्या सूचना केल्या तसेच उंमरे गावासाठी 14 व्या वित्त आयोगातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईबाबत बुधवारी मुक्ताईनगर येथील पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली.
नाथाभाऊंनी अधिकार्यांना घेतले फैलावर
तालुक्यातील पाच गावांना टँकर सुरू करण्याबाबत अहवाल सादर करणे तसेच उंमरे गावाला 14 व्या वित्त आयोगातून टँकरने पाणीपुरवठा करणे तसेच दोन गावांना विंधन विहिरी, नांदवेल गावाला विहिर खोलीकरण तर रुईखेडा गावाची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रसंगी करण्यात आली. याप्रसंगी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर लोखंडे, नायब तहसीलदार निलेश पाटील, कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही.ए.ढोणे, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.लोखंडे, सिंचन विभागाचे रवींद्र पाटील, बांधकाम विभागाचे शरद येवले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश पाटील, डॉ.डी.बी.चव्हाण, विद्युत वितरण कंपनीचे महेश चौधरी या प्रमुख अधिकार्यांसह सभापती शुभांगी भोलाने, जिल्हा परीरषद सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, वैशाली तायडे, विद्या गवळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, योगेश कोलते, तसेच सर्व पंचायत समिती सदस्य व इतर पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योजनेनंतर पाणी का नाही ; खडसे संतप्त
तालुक्यातील रामगड व पिंपरी भोजना या दोन गावांना विंधन विहिरीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले तर नांदवेल साठी विहीर खोलीकरण प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. तालुक्यातील रुईखेडा येथे योजनेतील पाणी केव्हा मिळेल? असा प्रश्न माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपअभियंता यांना विचारला त्यानुसार आठ दिवसात पाणी सुरू होईल असे अभियंत्यांनी सांगितले मात्र योजना पूर्ण होऊनही काम पूर्ण होत नाही पाणी ग्रामस्थांना का मिळत नाही ? या संदर्भात संतप्त होऊन खडसे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची झाडाझडती घेतली. त्यानुसार गटविकास अधिकारी व उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी पाहणी करून तत्काळ या योजनेबाबत अडचणी दूर करण्याचे आदेश खडसे यांनी याप्रसंगी दिली. पूर्णाड येथे तात्पुरती पाणीपुरवठा योजना मागील वर्षी झाल्याने यावर्षी नवीन पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता नसल्याचे योगेश कोलते यांनी सांगितले तर डोलारखेडा येथील विहीर खोलीकरणाचे बिले अद्याप बाकी असल्याचे पंचायत समिती सदस्य विकास पाटील यांनी मुद्दा मांडला. मात्र गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर लोखंडे यांनी 14 व्या वित्त आयोगातून निधी अदा करण्यात आल्याचे देखील याप्रसंगी सांगितले. गाव निहाय आढावा झाल्यानंतर खडसे यांनी टंचाई काळामध्ये नवीन विंधन विहिरीचे प्रस्ताव ग्रामसेवक यांनी सादर करावेत. तसेच उपरोक्त नमूद गावान व्यतिरिक्त ज्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असेल त्यांनी नवीन विंधन विहिर घेणे, गावातील विहिीर खोलीकरण करणे, तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेणे इत्यादी उपाययोजना ग्रामपंचायतीमार्फत कराव्यात तसेच या प्रस्तावांना मंजुरी आहेत ते प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश देखील खडसे यांनी दिले.