मुक्ताईनगरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळा बसणार

0

शिल्पकारासोबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली चर्चा

मुक्ताईनगर- शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांंचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भात माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी शिल्पकारासोबत चर्चा केली. गत स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2018 रोजी मुक्ताईनगर येथील आजादी महोत्सव समितीतर्फे कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात भाजपा आणि सर्व समाजाच्या वतीने भाजपाचे सरचिटणीस संदीप देशमुख, मुख्याधिकारी श्याम गोसावी, माजी सरपंच प्रवीण पाटील, रामभाऊ पाटील, पांडुरंग नाफडे यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पुतळा बसवण्यासंदर्भात एकनाथराव खडसे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. त्या अनुषंगाने 26 जानेवारी रोजी औरंगाबाद येथील प्रसिद्ध शिल्पकार नरेंद्र साळुंखे यांची भेट घेत पुतळ्यासंदर्भात चर्चा केली.

पुतळ्यासाठी परवानगी मिळण्याची प्रक्रिया
मुक्ताईनगर येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगर पंचायतीच्या प्रथम मसिक सभेत ठराव घेण्यात येवून पुतळा समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी संदीप दिनकरराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुतळ्यासाठी सर्व परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 26 रोजी आमदार खडसे यांच्यासमोर औरंगाबाद येथील शिल्पकार नरेंंद्र साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याचे मॉडेल सादर केले.
या वेळी पुतळा उभारणीसंबंधी बर्‍याच विषयांवर चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा ब्रांझ धातूमध्ये तयार करण्यात येणार आहे. पुतळा निर्माण समिती अध्यक्ष संदीप देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्याम गोसावी, माजी सरपंच प्रवीण पाटील, रामभाऊ पाटील, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.