डुकरे मालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत नगरपंचायतीचे पोलिसांना पत्र
मुक्ताईनगर- शहरात डुकरे पकडण्याची मोहिम नगरपंचायतीने सुरू केली असलीतरी या मोहिमेत डुकरे मालकांनी विरोध केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरपंचायतीने लेखी पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे. शहरात डुकरांचा उपद्रव वाढला असून थेट घरात शिरून लहान मुलांना चावा घेण्याचे प्रकार वाढले आहे. डुकरे पकडून गावाबाहेर पाठवण्यासाठी संबंधित डुकरे मालकांना नगरपंचायतीमार्फत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत मात्र त्यांनी नोटीसची दखल न घेतल्याने नगरपंचायतीने थेट डुकरे पकडण्यासाठी पथक नेमले आहे. पथक गेल्यानंतर मात्र डुकरे पकडू देण्यास मज्जाव करीत असल्याने डुकरे मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधितांची नावेदेखील पोलिसांना कळवण्यात आली आहे.