मुक्ताईनगरात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, हिवाळ्यात तापला राजकीय आखाडा

0
मुक्ताईनगर ग्रामपंचातीसाठी आगामी 26 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी ऐन हिवाळ्यात राजकीय आखाडा तापला आहे. नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीतही पणाला लागली असल्याचे राजकीय विश्‍लेषकांना वाटते.  या निवडणुकीविषयी सोशल मिडीयातूनही जोरदार चर्चा सुरू असल्याने निवडणूक चुरशीची व रंगतदार होईल हेदेखील तितकेच खरे !
सेना-भाजपात होणार काट्याची लढत
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात सेनेनेदेखील या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत तर दोघाही पक्षांतर्फे आगामी निवडणुकीत कोण उमेदवार असतील ? याबाबत अद्याप पत्ते राखून ठेवण्यात आले आहेत शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघात आपले प्रस्थ निर्माण करण्यास संथ गतीने का असेना सुरुवात केल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
नया भिडू, नया राज
त्याच-त्या चेहर्‍यांऐवजी यंदा नव्या व तरुण रक्ताला संधी देण्यात येईल, अशी शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांतर्फे याबाबत चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिलांमधूनही एकूणच शहरात असलेले वलय, कामाचा लेखाजोखा पाहून संधी देण्यात येईल, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.
बोगस भरती गाजणार?
ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या बोगस भरतीचा मुद्दा निवडणुकीत प्रभावीपणे चर्चिला जाईल, अशी चर्चा आतापासून रंगत आहे तर गेल्या पाच वर्षातील लेखाजोखादेखील मतदार डोळ्यासमोर ठेवून असल्याने निवडणूक कुठल्या रंजक वळणावर पोहोचते हे देखील काही दिवसांनी पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
सेना लावणार ताकद पणाला
सेनेचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील वाढत्या प्रतिसादानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गत पंचवार्षिकमध्ये सेनेचे तीन सदस्य निवडून आल्यानंतर यंदा नेत्यांनी कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागाचे आदेश दिले आहेत. एक सदस्य भाजपाच्या गोटात कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच दाखल झाला हेदेखील विशेष !  सेना जुन्या चेहर्‍यांना संधी देते की पुन्हा चेहर्‍यांना संधी देते हेदेखील लवकरच कळणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची दिलजमाई
की एकला चालो रे भूमिका ?
गत विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डोकेवर काढत भाजपला धक्का देत भाजपाचा बालेकिल्ला असलेला कुर्‍हा येथे सरपंच निवडून आणले परंतु मुक्ताईनगर येथे होऊ घातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पक्षांची दिलजमाई होणार का ? की स्वबळावर लढणार याकडेदेखील राजकीय विश्‍लेषकांच्या नजरा लागून आहेत.
कोण होणार लोकनियुक्त सरपंच
प्रथमच येथे ग्रामस्थांमधून लोकनियुक्त सरपंच निवडून द्यावयाचा असल्याने काहींनी आतापासून पक्षश्रेष्ठींकडे जोर लावला आहे मात्र पक्षाकडून अद्याप अधिकृरीत्या कुणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अर्थात शह-काटशहाच्या राजकारणात आधी प्रतिस्पर्धी पक्षाने नाव जाहीर केल्यानंतर आपले पत्ते ओपन करावयाचे असाच काहीसा राजकीय प्रघात आहे.
माजी मंत्री खडसेंना मंत्री पदाची प्रतीक्षा
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मंत्री मंडळात समावेश होणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत मात्र त्यांचे पुर्नवसन होते वा नाही याबाबतदेखील उत्सुकता लागून आहे.
-प्रवीण भोई, मुक्ताईनगर
9623866686