नगरपंचायतीची मोहिम ; शहरवासीयांकडून कारवाईबाबत समाधान ; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पालिकेने गठीत केले पथक
मुक्ताईनगर- शहरात गेल्या काही महिन्यांपासुन मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने शिवसेना महिला आघाडीतर्फे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती तसेच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवार, 17 रोजी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शाम गोसावी यांच्या आदेशानंतर पहिल्याच दिवशी 22 मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आल्याने नागरीकाीं समाधान व्यक्त करण्यात आले.
पथकाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त
कार्यालयीन अधीक्षकांनी सफाई कर्मचार्यांचे मुकादम अनिल तायडे व गणेश कोळी यांना लेखी आदेश देत कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार तायडे व कोळी यांनी राजा हंसकर, कालीचरण तेजी, साजन फतरोड, गोपाल लोहरे, सागर चिरावंडे, मनोज ढेंडवाल अशा सफाई कर्मचार्यांचा समावेश असलेले पथक तयार केले. पथकाने सोमवारी एकाच दिवसात 22 कुत्र्यांना पकडले त्यापैकी खोलवर जखमा झालेल्या कुत्र्यांना ठार केले तर कुत्र्यांना बाहेर जंगलात सोडण्यात येणार आहे व उर्वरीत कुत्र्यांचा देखील लवकरच बंदोबस्त करण्यात येईल,असे नगरपंचायतचे गणेश कोळी यांनी सांगितले.
स्मरण पत्रानंतर नगरपंचायत प्रशासनाला आली जाग
शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला होता. यातच दोन महिन्यात अनेक कुत्र्यांना खरुज व खोलवर जखमा झाल्याने हे कुत्रे बेभान होत नागरीकांना चावा घेत असल्याने भीती पसरली होती. याबाबत शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे-शिरसाठ यांनी निवेदन देत कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती मात्र नगरपंचायत प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याचे दिसुम आल्याने शिरसाठ यांनी पुन्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी महिलांना सोबत घेत नगरपंचायतीला स्मरण पत्र देत आंदोलनाचा इशारा दिला होता . त्यातच गेल्या चार ते पाच दिवसात अनेकांना बाधीत कुत्र्यांनी दंश झाल्याच्या घटना घडल्या तर काही दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताच्या घटना घडल्याने नगरपंचायत प्रशासन खाडकन जागे झाले व संबंधित सफाई कर्मचार्यांच्या मुकादमांना मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत आदेश देण्यात आले.