मुक्ताईनगरात रणरागिणींनी मांस, मच्छीबाजार पाडला बंद

0

पोलिस प्रशासन दखल न घेत नसल्याने महिलाच उतरल्या रस्त्यावर

मुक्ताईनगर- शहरातील बर्‍हाणपूर रोड, संत रोहिदास नगर प्रवेशद्वारालगत भरणारा मांस, मच्छी बाजार बंद करण्यासाठी या भागातील रणरागिणींनी बुधवारी रात्री साडेसात वाजता उग्ररूप धारण करून ही दुकाने बंद पडली. प्रशासन दखल घेत नसल्याने महिलाच रस्त्यावर उतरल्या व त्यांनी उघड्यावर मासे, चिकन विकणार्‍या विक्रेत्यांना हिसका दाखवला. या आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाने धाव घेत या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली दुकाने तात्काळ हटवली.

दखल न घेतल्याने रणरागिणी रस्त्यावर
मांस-मच्छी विक्रेत्यांना आठवडे बाजार परीसरात स्वतंत्रपणे मार्केट उभारून दिले असतांना विक्रेते अनधिकृतरीत्या बर्‍हाणपूर रोडवरील संत रोहिदास नगर प्रवेशद्वारालगत अनधिकृत पणे मांस, मच्छीची सर्रासपणे विक्री करीत होते. याबाबत या भागातील महिलांनी नगरपंचायत व पोलिसात निवेदन दिले परंतु दखल न घेतली गेल्याने गुरुवारी महिलांनी स्वतः रस्त्यावर येऊन ही दुकाने बंद पाडली. या दुकानांमुळे रहदारीस प्रचंड अडचण होत असते तसेच लगतच देशी दारूचे दुकान असल्याने मद्यपी लोक येथून ये-जा करणार्‍या महिला, विद्यर्थिनींची छेड काढतात, वादविवाद करताय, धिंगाणा घालतात, वाहने रस्त्यात लावतात शिवाय दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आल असून येथून काही अंतरावर मंदिरे आहे तर पुढे मुस्लिम बांधवांचे धार्मिक स्थळ आहे. सीड फार्म ते जावई कॉलनीपर्यंत जाण्यासाठी अधिकतर महिला या रस्त्याचा वापर करतात. अशात या अवैध दुकाने समस्यांचे माहेरघर बनल्याने विक्रेत्यांना नियोजित मार्केटमध्ये हलविण्यात यावे, अशी मागणी या संतप्त महिलांनी प्रसंगी केली. महिलांनी रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून दुकाने हटविली. दरम्यान या भागातून जाणार्‍या अवजड वाहनांबाबत ही महिलांनी तक्रार केली.