भुसावळ । मुक्ताईनगर शहरातील वॉर्ड क्रमांक 6 मधील दोघा भावंडांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना सोमवार 28 रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने घरातील सदस्यांचे दैव बलवत्तर असल्याने कोणाला काहीच इजा झाली नाही. वॉर्ड क्रमांक 6 मधील वैष्णवी नगरातील रहिवासी उत्तम काशीनाथ भोई व गणेश भागवत भोई या हातमजुरीवर उदरनिर्वाह करणार्या दोघा चुलत भावांचे कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहते.
सुदैवाने टळली प्राणहानी
28 रोजी रात्री 11.30 वाजेपासुन सुरु झालेल्या संततधार पावसाने मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास चांगलाच जोर पकडला होता. या अविरत सुरु असलेल्या पावसाने मात्र उत्तम भोई व गणेश भोई यांच्या घराची भिंत कोसळली व सर्व पत्रे झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर पडले परंतु दैव बलवत्तर म्हणुन दोघ भावांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला इजा झाली नाही.
अनेकांची धाव, प्रशासनाकडून पंचनामा
दरम्यान सकाळी भोई कुटुंबियांच्या घराची भिंत कोसळल्याची माहिती शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील व तालुकाप्रमुख छोटु भोई यांना मिळताच त्यांनी भोई भावंडाच्या घराकडे धाव घेतली. तहसीलदार रचना पवार-पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. तहसीलदार यांनी लागलीच पंचनामा करण्याकामी मंडळ अधिकारी पी.एस.पाटील व कोतवाल भागवत भोलाणे यांना पाठविले.
प्रशासनाकडून पंचनामा
पाटील यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार उत्तम भोई यांच्या घरातील साहित्य नुकसान व भिंत असा अंदाजित नुकसान 35 हजार तर गणेश भोई यांच्या घरातील साहित्य व भिंत असे एकूण नुकसान 32 हजार म्हणजे एकूण 67 हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. भरपाई देण्याची मागणी या कुटुंबियांनी केली आहे. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटु भोई, युवासेना तालुकाप्रमुख सचिन पाटील, प्रविण चौधरी, दीपक भोई, अविनाश अडकमोल, धीरज जावरे आदी उपस्थित होते.