मुक्ताईनगरात सट्ट्यावर कारवाई : चौघे जाळ्यात

नाशिक आयजींच्या विशेष पथकाची कारवाई ः 18 हजारांचा मुद्देमाल जप्त ; अवैध व्यावसायीकांच्या गोटात खळबळ

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह गृहमंत्र्यांकडे केल्यानंतर मुक्ताईनगर अलिकडेच सत्ता संघर्ष पेटला होता. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांमध्ये आरोपांच्या फैरीदेखील झडल्या होत्या मात्र हे सर्व सुरूच असतानाच दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगरातील अवैध धंदे चालकांविरोधात नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे पथकाने कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरात सट्टा, पत्ता, चक्रीचा सट्टा, ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची तक्रारी होत्या. त्यातच शहरातील प्रवर्तन चौकालगत सट्टा घेतला जात असल्याची गुप्त माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांना मिळताच त्यांनी विशेष पोलिसकरवी धाड टाकत मुक्ताईनगरातील प्रमोद हरीभाऊ भारंबे, नरेश भागवत शिर्के, विलास देविदास मिस्तरी, राहुल प्रकाश झाल्टे यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला. संशयीतांकडून 17 हजार आठशे रुपये रोख, सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिस नाईक मनोज दुसाणे यांच्या फिर्यादीवरुन वरील चौघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई विशेष पोलिस पथकातील पोलिस निरीक्षक बापुराव रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोसिल निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे व कर्मचार्‍यांनी केली.

कायमस्वरुपी अवैध धंदे हद्दपार होण्याची अपेक्षा
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकालगत एका गल्लीत सट्टा-जुगाराच्या सुमारे 20 ते 25 टपर्‍या असून आयजींच्या कारवाईमुळे प्रवर्तन चौकातील खत्री गल्लीत सन्नाटा पसरला आहे. कायमस्वरुपी हे सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजे, अशी मागणी जोर धरीत आहे. पोलिसांनी अवैध धंदे चालकांविरोधात अशीच कारवाई करण्याची अपेक्षा आहे. बडे मासेही जाळ्यात अडकण्याची माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.