मुक्ताईनगरात 30 वर्षात जे उभं राहीले ते नाथाभाऊमुळेच !

0

मुख्यमंत्र्यांनी काही दिले नाही : एकनाथराव खडसेंचा टोला

जळगाव:गेल्या तीस वर्षात मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करतांना अनेक विकासकामे केली. या 30 वर्षात मुक्ताईनगर मतदारसंघात जे जे विकासात्मक काही उभे राहिले ते केवळ नाथाभाऊमुळेच असा टोला भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर लगावला. दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काहीच न देता गेले आणि भ्रमनिरास झाला अशी टिकाही खडसेंनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन दिवसापुर्वी महाविकास आघाडीचा मुक्ताईनगर येथे शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून मुक्ताईनगरला मुक्त केल्याबद्दल जनतेचे आभार मानुन खडसेंना चिमटा घेतला होता. यासंदर्भात भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, शेतकरी मेळाव्यात खा. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी भाषण करतांना अनेक योजनांची नावे घेतली.

ज्या योजनांची नावे घेतली त्या सर्व योजना नाथाभाऊमुळे झाल्या. मुक्ताईनगर मतदारसंघात कृषी महाविद्यालयासाठी 100 एकर जमीन मोफत दिली, ती दानत केवळ नाथाभाऊकडेच होती. अल्पसंख्यांकांसाठीची कामे, वसतीगृह, बोदवड उपसा सिंचन योजना, ओडीए योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना जे जे नविन काम दिसेल ते नाथाभाऊनेच केले आहे. याउलट काही कामांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निधी देण्याची भाषा केली असती तर आनंद वाटला असता. मात्र मुख्यमंत्री काहीच न देता निघुन गेल्याचे वाईट वाटते. योजनांना पैसा देऊ एवढा शब्द जरी उच्चारला असता तरी समाधान वाटले असते असा टोलाही एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला.

नाथाभाऊ पराभूत नाही

मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या 40 वर्षापासून काम करीत आहे. त्यामुळे नाथाभाऊला त्यांनी पराभूत केले नाही. अजुन नाथाभाऊ कायम असल्याचेही खडसे यांनी सांगितले.