मुकटी : गावापासून जवळच असलेल्या काटसरनजीक भरधाव लक्झरी व गॅस टँकरमध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघातामुळे व गॅस टँकरच्या स्फोट होण्याच्या भीतीने दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर डिझेल टाक्या फुटल्याने गॅस टँकरचा पुढील भाग जळाला तर संपूर्ण लक्झरीदेखील पेट घेतला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असलीतरी आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे कळू शकली नाही तर दोन्ही वाहने एकमेकात घुसल्याने कुठल्याही वाहनातील कुणाचा मृत्यू झाला याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
अपघातानंतर पोलिस प्रशासनाची धाव
अपघाताचे वृत्त कळताच धुळे तालुक्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रीत केली. पोलिस प्रशासनाकडून अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून वाहनांच्या क्रमांकावरून त्यांच्या मूळ मालकांशी संपर्क साधून मृतांची ओळख पटवली जाणार आहे. दरम्यान, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर काही वेळेत दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवता आले तर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याचे सांगण्यात आले.