मुक्ताईनगर: सुमारे एक महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एस.टी.कर्मचार्यांनी राज्य शासनात महामंडळाचे विलीनकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. संपावर तोडगा निघत नसतानाच मुक्ताईनगर आगारातील चालकाचा हृदय विकाराने निधन झाल्याने एस.टी.कर्मचार्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली. जितेंद्र गोपाळ नाथजोगी (45, मुक्ताईनगर) असे मयत कर्मचार्याचे नाव आहे.
विवंचनेत असताना हृदयविकाराचा झटका
मुक्ताईनगरातील जुन्या गावातील रहिवासी असलेले नाथजोगी एस.टी. मध्ये चालक म्हणुन कार्यरत होते. त्यांचे 17 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ह्यदयविकाराने मुक्ताईनगर येथील जुने गावातील जोगीवाडा येथे राहते घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, बहिण, दोन मुले असा परीवार आहे. ते जगदीश नाथजोगी, राजु नाथजोगी, दत्तात्रय नाथजोगी यांचे भाऊ होत.
अंत्यविधीसाठी तातडीची मदत
शुक्रवारी दुपारी 12 वाजता मुक्ताईनगर एस.टी. आगारातील विविध संघटनेचे पदाधिकारी, चालक-वाहक यांनी घरी येत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. एस.टी.कडून कुटुंबियांना पाच हजाराची मदत देण्यात आली. प्रसंगी आगारप्रमुख संदीप साठे, पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी सात्वन केले. अतिशय त्रोटक पगारात आपल्या कुटुंबाचा गाडा असणारे व राज्य परीवहन महामंडळाला नफा मिळवून देणारे राज्य परीवहन महामंडळाचे चालक-वाहक हे आपल्या मागणीसाठी गेल्या दीड ते दोन महिन्यापासून बेमुदत संपावर आहेत. त्यावर शासन तोडगा काढत नसल्याने कर्मचार्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच काहींनी कर्ज घेतलेले आहेत तर ते कर्ज फेडावे कसे ? आपल्या कुटुंबाचा गाडा तसेच पालन-पोषण करावे कसे ? असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत. अशा परिस्थितीत आतापर्यंत 50 कर्मचार्यांनी आपले जीवन संपवले आहे.