मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची वाताहत न थांबल्यास तीव्र आंदोलन

0

जिल्हा शल्य चिकित्सकांना शिवसेनेने दिला लेखी निवेदन देवून इशारा

मुक्ताईनगर- शहरातील उपजिल्हा रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रस्त असल्याने यावर तात्काळ उपाय योजना राबवित समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात यावे अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यास आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांना 19 ऑक्टोबर रोजी देण्यात आला.

कायमस्वरुपी कर्मचार्‍यांसह औषधांचा व्हावा पुरवठा
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , येथील उपजिल्हा रुग्णालयात मतदारसंघातील गावांमधून दररोज सहाशे ते सातशे रुग्ण उपचारासाठी येतात परंतु डॉक्टरांअभावी त्यांना परत जावे लागते तसेच या रुग्णालयात सफाई कर्मचारी असूनदेखील तो कायम नसल्यासारखाच असल्याने रुग्णालयात व परीसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र दुर्गंधी होत असल्याने येथे येणार्‍या रुग्णांची तब्येत न सुधरता उलट बिघडते. यासाठी कायमचा होतकरू सफाई कर्मचारी देण्यात यावा तसेच औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णाचे अतोनात हाल होत आहेत व शवविच्छेदन कर्मचार्‍याचीही नियुक्ती करण्यात यावी तसेच रुग्णालय परीसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच दिवाबत्ती व पंखे तत्काळ बसविण्यात यावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अफसर खान, शहरप्रमुख गणेश टोंगे, नगरपंचायत गटनेता राजेंद्र हिवराळे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, शहर संघटक वसंत भलभले, प्रफुल्ल पाटील, प्रभाग क्रमांक 12 चे शाखाप्रमुख स्वप्निल श्रीखंडे, जीवन मोरे आदींसह शिवसेना पदाधिकारी तथा असंख्य शिवसैनिक बांधव उपस्थित होते.