मुक्ताईनगर तालुका 50 टक्के झाला हगणदारीमुक्त

0

जळगाव । केंद्र शासनाचा स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्तीचा संकल्प आहे. हगणदारीमुक्तीसाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. हा शासनाचा प्राधान्यक्रमाचा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत शौचालय बांधकामासाठी वैयक्तिक अनुदानासह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. शासनाला यात यश येत असतांना दिसत आहे. दरम्यान मुक्ताईनगर तालुका 50 टक्के हगणदारीमुक्त झाला आहे. तालुक्यातील 62 गावांपैकी 34 गावे हगणदारीमुक्त झाले आहे. उर्वरीत 28 गावे 15 सप्टेंबरपर्यत हगणदारीमुक्त करण्याच्या सुचना पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे व गटविकास अधिकारी डी.आर.लोखंडे यांनी पंचायत समितीत आयोजित बैठकीत ग्रामसेवकांना दिले. हलखेडा, कोर्‍हाळे, कुर्‍हा, मेंढोळदे, पिंप्राळे, सुळे, सुकळी, टाकळी, वढोदे, घोडसगाव आदी गावात पन्नास टक्के हगणदारीमुक्त झाले आहे.

हगणदारीमुक्त गावे याप्रमाणे
बेलसवाडी, भोटा, बोदवड, बोरखेडा, चारठाण, खिली, पातोंडी, नरवेल, चिचखेडा खुर्द, चिंचोल, धामणगाव, दुई, हिवरे, इच्छापुर, पिंप्रीपंचम, पिंप्रीनांदु, पंचाणे, जोंधनखेडा, कर्की खामखेडा, कोथळी, लोहारखेडा, महालखेडा, सालबर्डी, राजुरा, पुरनाड, माळेगाव, मेळसांगवे, सारोळा, शेमळदे, थेरोळा, वायला काकोडे आदी गावे हगणदारीमुक्त झाले आहे.

आमदार एकनाथराव खडसेंची सूचना
माजीमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी 7 ऑगस्ट रोजी तालुक्यातील काही गावांना भेटी देत असतांना पिंप्री अकाराऊत या गावात गाडी शिरत असतांना प्रवेश द्वाराजवळ त्यांना रस्त्यावर शौचविधी करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ गावातील कार्यकर्त्यांना गाव हगणदारीमुक्त करा व रहिवाशांना शौचालय बांधण्यास प्रोत्साहीत करा अशा सूचना दिल्या. तसेच चार महिन्यापूर्वी ग्रामसेवकांच्या बैठका घेवून 10 ग्रामसेवकांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. तर तालुक्यातील तिन ग्रामसेवकांना सीईओ यांनी निलंबीत केले होते.