मुक्ताईनगर तालुक्याच्या विकासासाठी 51 कोटी

0

जळगाव । राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत जिल्हातील मुक्ताईनगर तालुक्याचा समावेश करण्यात आला असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सोयी सुविधेसाठी 51.72 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तालुक्याच्या विकासासाठी विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. मुक्ताईनगरच्या विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी वाघ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रात बगाडे, अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांचेसह विविध यंत्रणाचे प्रमूख उपस्थित होते.मुक्ताईनगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या परिश्रमातून निधी मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने तालुक्याचा कायापालट होणार आहे.

असा आहे आराखडा
24 तास जलवाहीनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 9 कोटी रुपये, स्वच्छतेच्या उपाययोजनांसाठी 6.93 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.03 कोटी, रस्त्यालगत गटार बांधण्यासाठी 10.79 कोटी, रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यासाठी 51 लाख, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतंर्गत बस स्टॉप बांधण्यासाठी 12 लाख, गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी 5 लाख, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रासाठी 2.25 कोटी, कृषि प्रक्रिया उद्योगासाठी 6 कोटी, वृक्ष लागवडीसाठी 3 कोटी, आरोग्य सुविधांसाठी 5.70 कोटी, शैक्षणिक सुविधांसाठी 3.70 कोटी, भक्तनिवासासाठी 2 कोटी, डिजिटल लायब्ररीसाठी 40 लाख तर शहरी सुविधा केंद्रासाठी 25 लाख रुपये आदि बाबींचा या प्रकल्प आराखडयात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून ही कामे वेळेत व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.