मुक्ताईनगर तालुक्यात एक कोटींचा अवैध वाळू साठा जप्त

0

महसूल प्रशासनाच्या कारवाईने खळबळ ; वाळू माफियांचे दणाणले धाबे

मुक्ताईनगर- तालुक्यातील रीगाव व कोराळा गावात विनापरवाना रॉयल्टी नसताना वाळूचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आल्याची माहिती मुक्ताईनगर तहसील प्रशासनाला मिळाल्यानंतर तलाठी व सर्कल यांच्या पथकाने अचानक धडक देत अवैधरीत्या साठा केलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या 250 ब्रास वाळूचा पंचनामा केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली. हा वाळू साठा जप्त करण्यात आला असून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. तालुक्यातील कोराळा व रीगाव परीसरातील पूर्णा नदी पात्रात अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. महसूल विभागातर्फे मंडळ अधिकारी मिलिंद बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी धीरज ढेकणे व भाग्यश्री पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रसंगी विविध गावांचे कोतवालदेखील उपस्थित होते. कुर्‍हा परीसरातील गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वी देखील 250 ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती.