मुक्ताईनगर- नगरपंचायतीमध्ये बहुप्रतीक्षित अशा स्थायी समितीचे शुक्रवारी गठण करण्यात आले. नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत बैठकीत झाली. प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर पिठासीन अधिकारी होते. यापूर्वी 31 ऑगस्टला झालेल्या विशेष सभेत विषय समिती सदस्यांची निवड झाली होती. मात्र स्थायी समितीची निवड राहिल्याने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या समितीत समावेशासाठी अनेक इच्छुकांनी लॉबिंग केली होती. यानुसार शुक्रवारी झालेल्या सभेत निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. त्यात समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा नजमा तडवी आणि सदस्या म्हणून मनीषा पाटील, शेख शकील शेख शकूर खाटीक, शेख मस्तान कुरेशी, नीलेश शिरसाठ, साधना ससाणे यांचा समावेश आहे.
असे आहेत समिती सभापती
बांधकाम समिती – मनीषा पाटील (उपनगराध्यक्षा), शिक्षण समिती- शेख शकील शेख शकुर खाटीक, आरोग्य समिती- शेख मस्तान कुरेशी, पाणीपुरवठा समिती- नीलेश शिरसाठ, महिला व बालकल्याण समिती – साधना ससाणे यांचा समावेश आहे. निवडीनंतर आरोग्य समितीचे सभापती शेख मस्तान कुरेशी यांनी नागरीकांनी सुका कचरा नगरपंचायतीच्या घंटा गाडीमध्येच टाकावा तसेच उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.