मुक्ताईनगर- पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर येथे तिरंगी व चौरंगी लढती होत असून निवडणुकीचे प्रचाराचे सूत्र, नियोजन व निवडणूक तंत्र हे तीन ठिकाणाहून हलत असून खर्या अर्थाने सत्तेचे तीन केंद्र मुक्ताईनगर शहरात मतदारांना पाहण्यास मिळत आहे.
खडसे फार्महाऊस पहिले केंद्र
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागांवर उमेदवार उभे करून निवडणूक तंत्राच्या आखणीमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसून येते. खडसे फार्म हाऊसवर भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सत्तेचे केंद्र बनले आहे. निवडणुकीचे सर्व प्रचार यंत्रणा व नियोजन खडसे फार्म हाऊसवरून केले जात आहे. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या नियोजनानंतर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पक्ष कार्यालय येथून हे नियोजन राबवले जात आहे. वॉर रूममध्ये जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, विलास धायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, शहराध्यक्ष मनोज तळेले हे वॉररूम सांभाळत आहेत.
शिवसेनेची वॉररूम वर्धमान रेसिडेन्सीमध्ये
शिवसेनेनेदेखील अतिशय जोमाने निवडणुकीमध्ये सहभाग घेतला असून नगराध्यक्षपदासह 12 सेनेचे उमेदवार व दोन पुरस्कृत अशा 14 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. उर्वरीत तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सोबत आघाडी केलेली आहे. प्रचाराची संपूर्ण रणनीती शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सुराना नगराजवळील वर्धमान रेसिडेन्सीमधून आखली जात असून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे स्वतः या ठिकाणी बसून संपूर्ण नियोजनावर लक्ष देत आहेत. निवडणुकीच्या शिवसेनेच्या वॉर रूममध्ये तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, मनोहर खैरनार, कलीम मन्यार, प्रवीण चौधरी, अरुण मिस्त्री ही टीम प्रचाराची रणनीती आखून त्याचे नियोजन करून कार्यान्वित करण्याचे काम करत आहे.
डॉ.जगदीश पाटील यांचे हॉस्पिटल काँग्रेसचे सत्ता केंद्र
महाआघाडीतून वेगळी चूल मांडलेल्या काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारासह सात उमेदवार दिल्याने नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीचा रंग भरला असून काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे संताजी नगरातील डॉ.जगदीश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयातून राबवली जात आहेत. जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान ईस्माईल खान, प्रभाकर पाटील, शहराध्यक्ष आलम शहा, माजी अध्यक्ष अॅड. अरविंद गोसावी, अनिल सोनवणे हे सर्व प्रमुख पदाधिकारी काँग्रेसची वॉररूम सांभाळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक तीन, आठ व पंधरा या केवळ तीन प्रभागातून उमेदवार दिलेले असल्याने पक्षाच्या कार्यालयात भेट दिली असता शुकशुकाट आढळून आला. पक्षाच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष पासून कार्यालयीन कर्मचारी वगळता कोणीही कार्यकर्ते अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हते.