मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी उद्या मतदान

0

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : बहुतांश वॉर्डांत रंगणार चुरशीच्या लढती

मुक्ताईनगर- नगरपंचायत निवडणुकीसाठी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली असून नगराध्यक्ष तसेच 17 वॉर्डांतील नगरसेवकांसाठी रविवारी निवडणूक होत आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात बहुतांशी वॉर्डात चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने युती केली आहे तर भाजपा स्वबळावर लढत आहे. माजी मंत्री खडसे स्वत: मुक्ताईनगरात तळ ठोकून आहेत. खडसे यांनी भाजपतर्फे तरुण आणि नवीन उमेदवारांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनही सज्ज झाले आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या : होम टू होम पचार
प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्याने सोशल मीडिया आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा जोर सुरू झाला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपच्या उमेदवार नजमा तडवी, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माधुरी तायडे आणि काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना तायडे यांच्यात सरळ लढत होत आहे.

भाजपतर्फे सर्वच जागांवर उमेदवार
नगरपंचायत निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या 14 जागा लढविल्या जात आहेत. तर काँग्रेसने नगराध्यक्षपदासह सात जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार दिले आहेत.

20 जुलैस होणार मतमोजणी
15 जुलैस मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांसह राज्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल 29 मतदान केंद्रे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी दिली. वानाडोंगरी (ता. नागपूर) येथील पालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जांमध्ये छाननीअंती उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 20 जुलैला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज
पहिल्यांदाच होणार्‍या नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. मुक्ताईनगर शहरात शुक्रवारी सायंकाळी पोलिसांतर्फे पथसंचलन करण्यात आले. तसेच निवडणुकीच्या दिवशी एकूण 350 पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त असणार आहे. त्यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 13 पोलीस उपनिरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, 100 होमगार्ड तसेच 200 कर्मचारी व 20 महिला कर्मचार्‍यांची एकूण 350 कर्मचार्‍यांची नियुक्ती कायदा व व्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेली आहे.

17 प्रभागांसाठी 29 बुथ
रविवार, 15 रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी 17 प्रभागांसाठी एकूण 29 बुध आहेत. त्यावर 180 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक बुथवर एक मतदान केंद्राध्यक्ष, त्यांच्यासमवेत दोन सहाय्यक मतदान केंद्र अधिकारी, एक शिपाई व एक पोलिस कर्मचारी अशा पाच कर्मचार्‍यांची एका केंद्रावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ आढाव यांनी दिली.