मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक ; तिसर्‍या दिवशीही अर्ज नाही

0

थकबाकीमुळे महसुलात सातत्याने वाढ ; इच्छूकांच्या मोर्चेबांधणीला वेग

मुक्ताईनगर : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी गुरुवारीदेखील एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही तर केवळ एकमेव अनामत पावती फाटली असली तर जागो-जागी ऑनलाईन फार्म भरणयासाठी इच्छुकांची तोबा गर्दी झालेली दिसून आली. करापोटी पहिल्या दिवशी दोन लाख 70 हजार, दुसर्‍या दिवशी एक लाख पन्नास हजार तर तिसर्‍या दिवशी एक लाख पन्नास हजार रुपये थकबाकी इच्छुकांतर्फे भरण्यात आली तसेच तीन दिवसात निव्वळ दाखल्यांपोटी 25 हजार रुपये जमा झाले आहेत.

सुचकांबाबत दिशाभूल
नामनिर्देशन पत्र दाखल करतांना पक्षाच्या उमेदवारास एक सुचक व अपक्ष उमेदवारास पाच सुचक आवश्यक असल्याचे सुचना पत्रक लावण्यात आले आहे. उमेदवारी अर्जासाठी अत्यंत कमी वेळ असल्याने इच्छुकांतर्फे थकबाकी भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. यातच एक अफवा अशी पसरलेली आहे की सुचकांची देखील थकबाकी थकलेली नसावी त्यामुळे इच्छुकांतर्फे थकबाकी नसलेल्या सुचकांचा शोध सुरूझाला तर काहींनी सुचकांचीही थकबाकी क्लियर करणे सुरू केलेे आहे .

सूचकांबाबत आदेश नाही -प्रांताधिकारी
सुचकांच्या कर थकबाकीबाबत असा कोणताही आदेश नाही तर उमेदवार ज्या प्रभागात उमेदवारी करेल त्याच प्रभागातील सूचक असावा, असा नियम असल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर म्हणाले.