मुक्ताईनगर – नगरपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या कंट्रोल युनिटमध्ये बदल करण्यात आल्याची तक्रार प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवाराने केल्याने खळबळ उडाली आहे. मतदानाच्या पुर्व तयारीत मतदान यंत्र (ईव्हीएम मशीन) सिलिंग करतांना प्रभाग क्र. 11 च्या पहिल्या मतदान केंद्रावर कंट्रोल युनिट 06154 हे कंट्रोल युनिट दाखविण्यात आले होते आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी या मतदान केंद्रावर 06164 क्रमांक असलेले कंट्रोल युनिट वापरण्यात आल्याची तक्रार या प्रभागातील उमेदवार जाफर अली नजीर अली यांनी केली आहे. मतदान करण्यास गेल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ निवडणूक निर्णय अधिकार्यांचे नावे आपली तक्रार मतदान केंद्रावरील केंद्र प्रमुखाकडे नोंदवली व कंट्रोल युनिटची सत्यता पडताळणी करण्याची विनंती केली. जाफर अली यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या वतीने या तक्रारीबाबत प्रतिसाद वा समाधान करण्यात आलेले नाही. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.