मुक्ताईनगर नगरपंचायत विषय समिती सभापती पदासाठी 3 रोजी निवडणूक
विषय समिती सदस्यांमधून निवडले जाणार सभापती ः निवडीकडे लागले लक्ष्य
मुक्ताईनगर (संदीप जोगी) : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या स्थायी व पाच समितीच्या सदस्यांची निवड 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. निवड झालेल्या विषय सदस्यांमधून होणार्या समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागते ? याकडे शहरवासीसांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पत्रानुसार नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदाची निवड 3 मार्च रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होईल. पालिकेतील राजकीय चित्र बदलले असून शिवसेनेचे 10 सदस्य असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष्य लागले आहे. पालिकेत भाजपाची सत्ता स्थापन झाल्यापासून विषय समितींपैकी बांधकाम समिती सभापतीपदी उपनगराध्यक्षा पदसिद्ध सभापती होत्या. गतवेळी पालिकेतील विषय समिती सभापतीमधील सार्वजनिक बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे यांचे नाव निश्चित असताना ऐनवेळी त्यांना वगळून पुन्हा उपनगराध्यक्षा मनिषा पाटील यांना कायम ठेवण्यात आले होते. येथूनच भाजपाच्या गटात ठिणगी पडली होती त्यामुळे आता राजकीय स्थिती बदलल्याने सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सेनेकडे 10 तर भाजपाकडे सात सदस्य
मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याने निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नेतृत्वात पालिकेवर भाजपाचा झेंडा रोवला गेला. नगराध्यक्षासह पालिकेच्या 17 पैकी 13 व एक अपक्ष असे 14 सदस्य भाजपचे तर तीन सदस्य शिवसेनेचे निवडून आले होते. नंतर राजकीय गणिते बदलत गेली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने येथील पालिकेतील भाजपाचे नगरसेवक खडसेंच्या गोटात गेले. नंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पालिकेतील भाजपाच्या सात नगरसेवकांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पालिकेत आता शिवसेनेचे 10 व भाजपाचे ( आता काही नगरसेविकांचे पती राष्ट्रवादीत आहेत) सात सदस्य आहेत.
तर यांना मिळू शकेल सभापतीपदाची संधी
सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपगटनेता संतोष मराठे, संतोष कोळी, शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक कार्य सभापतीपदी प्रभारी नगराध्यक्षा मनिषा प्रवीण पाटील, निलेश शिरसाट, पाणीपुरवठा व जलनिसा:रण सभापतीपदी मुकेशचंद्र वानखेडे, पियुष मोरे, महिला व बालकल्याण सभापतीपदी सविता सुभाष भलभले, बिल्कीसबी अमानुल्लाखान, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी नुसरतबी मेहबुबखान, शबानाबी अब्दुल आरीफ.
10 महिन्यापासुन सर्वसाधारण सभा नाही
15 एप्रिल 2021 रोजी पालिकेने नगराध्यक्षा नजमा तडवी यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेतली होती. या सभेत तब्बल 240 विषय मंजुर करण्यात आले होते. तेव्हापासुन नगरपंचायतीने सर्वसाधारण सभा घेतलेली नाही.