कैलास कोळी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा इरफान तडवी यांच्या निवडीला/ नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नागरीक गिरीश चौधरी यांच्यातर्फे अॅड.भाऊसाहेब देशमुख यांनी तडवी यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. 14419/ 2020 या क्रमांकान्वये सदर याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका
महाराष्ट्र नगरपालिका कायद्यानुसार कलम 51 ब प्रमाणे तडवी यांनी निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. यामध्ये नंतर सरकारने सहा महिन्यांची मुदत एक वर्ष केली परंतु तडवी यांनी त्या मुदतीत सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा 20 जुलै 2018 रोजी लागला व तडवी यांनी त्यांची जात वैधता प्रमाणपत्र हे नगरपालिकेच्या आवक-जावक बारनिशी प्रमाणे 15 ऑक्टोबर 2019 म्हणजे वाढीव मुदतीपेक्षाही सुमारे तीन महिन्यांच्या विलंबाने सादर केले आहे. त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांची थेट नगराध्यक्षपदाची निवड पूर्वलक्षी प्रभावाने आपसूकच रद्द होते. री ऑफ को वारंटोप्रमाणे त्यांची निवडणूक/ निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द झाली आहे, हे घोषित करण्यासाठी सदरची याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शासन व इतरांनी म्हणजेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांनी वेळीच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित होते, पण त्यांनी तसे केले नाही म्हणून त्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. चौधरी यांच्यातर्फे उच्च न्यायालयात अॅड. भाऊसाहेब देशमुख काम पाहत आहेत.