मुक्ताईनगर- तत्कालीन ग्रामपंचायतीने बांधकाम केलेल्या नाट्यगृहाचे शिवाजी नाट्यगृह असा एकेरी उल्लेख होत असल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक संतोष मराठे यांनी नगरपंचायतीच्या पहिल्याच सभेत करीत या नाट्यगृहावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, मुक्ताईनगर असे नाव टाकण्याची मागणी केली होती. यावर नगरपंचातीच्या पहिल्याच सभेत सर्वानुमते नाट्यगृहाचे नामकरण करण्याचे ठरले होते. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी शाम गोसावी व नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी ई टेंडरींग द्वारा क्रलिक नावासाठी मक्तेदारांकडून दरपत्रक मागविले होते त्यानुसार सर्वात कमी दरात (रक्कम 38 हजार रुपये) असलेल्या भुमी कंस्ट्रक्शन यांना या नावाचा मक्ता देण्यात आल्याने मक्तेदाराने 22 जानेवारी रोजी नाट्यगृहावर अतिशय सुंदर असे अॅक्रलिक प्रकारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, मुक्ताईनगर नगरपंचायत असे नाव नाट्यगृहाच्या इमारतीवर लावल्याने शिवप्रेमींतर्फे समाधान व्यक्त होत आहे.