नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी सुरू केल्या मतदारांच्या गाठीभेटी
भुसावळ- मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीने गती घेतली असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चार तर नगरसेवक पदासाठी एकूण 113 उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचे लक्ष माघारीच्या दिवसाकडे लागले आहे. नामाकंन दाखल केलेल्या नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी संपुर्ण शहरातील मतदारांच्या गाठी-भेटीवर भर दिला आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या नगरपंचायतीच्या या निवडणुकीत अनेक उमेदवारांना माघारीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे अमिष दाखवले जात असल्याची चर्चाही शहरात रंगू लागल्या आहेत. शिवाय भाजपाचे ज्येष्ठ नेते व शिवसेनेचे जिल्हास्तरीय नेते या शहरातील असल्याने या निवडणुकीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार
शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी जोत्स्ना दिलीप तायडे, भाजपकडून छाया संजीव पालवे व नजमा इरफान तडवी असे दोन तर काँग्रेसकडून माधुरी आत्माराम जाधव असे एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी भाजपाचा एक पर्यायी उमेदवार वगळल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यास समोरा-समोर लढत होईल मात्र यासाठी सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले आहे.
भाजपा विरोधात आघाडी
मुक्ताईनगरची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व भाजपा हे दोनच पक्ष बलाढ्य दिसून येत आहेत तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षसुद्धा ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी आघाडी केली आहे परंतु नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा अर्ज असतांनाही काँग्रेसनेही उमेदवार दिल्याने व शिवसेनेनेही काँग्रेसला सोडलेल्या जागांवर उमेदवार दिल्याने काँग्रेसच्या बाबतीत खरे चित्र माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
नगरसेवक पदासाठी 113 उमेदवार रिंगणात
नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतल्याने भाजप, शिवसेना व काँग्रेसने राजकीय शक्कल लढविली आहे. त्यात भाजपाने नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 16 प्रभागात (क्रमांक 3 प्रभाग वगळल्यास) दोन उमेदवारांना ए.बी फार्म दिलेले आहेत. शिवसेनेने देखील पाच ठिकाणी तर काँग्रेसने एका प्रभागात दोन उमेदवारांना ए.बी फार्म दिले आहेत. यामुळे शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ व अपक्ष असे एकूण 113 उमेदवार सद्यस्थितीत रिंगणात आहेत.
भाजपाचे गुपीत धोरण
भाजपने अनेक वॉर्डांमध्ये दोन उमेदवारांना ए.बी फार्म दिले असल्याने अजुनही भाजपा उमेदवारीबाबत गुप्तता पाळत आहे. त्यामुळे भाजपाचे हे गुपीत धोरणाच्या भुमिकेबाबत भाजपाच्या उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे तर शिवसेनेकडून घोषित झालेले उमेदवार मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठीवर भर देत आहेत. यामुळे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानेे शिवसेनेच्या गोटात उत्साह दिसत आहे.
राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती
एका जागेसाठी एकापेक्षा अधिक उमेदवार सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक असल्याने ज्यांना पक्षाकडून ए.बी फार्म मिळालेले नाहीत. असे अनेक इच्छुक कार्यकर्ते सध्या नाराज असल्याने पक्षनेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. तर माघारीच्या दिवशी काही उमेदवारांना माघारीसाठी पक्ष सुचवणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती निर्माण झाली आहे.
निवडणुकीत गाजणार समस्या आणि विकासाचा मुद्दा
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचा मुद्दा सत्ताधार्यांकडून मांडण्याचा प्रयत्न होणार आहे तर विरोधकांकडून शहरातील पाण्याची समस्या, रस्ते अशा अनेक समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न होईल यात शंका नाही. यामुळे सर्व शहरवासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.