मुक्ताईनगर पालिकेची पहिलीच सभा ठरली वादळी

0

शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेक विषयांवर नोंदवली हरकत

मुक्ताईनगर- नगरपंचायतीची पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. अजेंड्यावरील महत्वपुर्ण 14 विषयांवर वादळी चर्चा झाली. सभागृहात भाजपाचे पूर्ण बहुमत असलेतरी शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रत्येक विषयांची उकल केली. काही विषयांना हरकत नोंदवण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नजमा तडवी होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा मनिषा पाटील, भाजप गटनेते पियुष मोरे, उपगटनेते संतोष कोळी, सभेला मुख्याधिकारी शाम गोसावी यांची उपस्थिती होती. सभेसाठी शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे, उपगटनेते संतोष मराठे यांच्यासह 16 नगरसेवक उपस्थित होते. पहिल्याच बैठकीला भाजपचे नगरसेवक मुकेश वानखेडे अनुपस्थितीत राहिले.

पाणीप्रश्‍नावरून गाजली सभा
शहरात 12 हजार डस्टबीन खरेदी करून नागरीक तसेच दुकानदारांना प्रत्येकी दोन अशा डस्टबीन मोफत वाटप करण्याचे तसेच सुका तसेच ओला कचरा असे नियोजन करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजनेला सत्ताधार्‍यांनी आवाजाने मंजुरी दिल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 4.97 कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या फिल्टरेशन प्लँटला नगरपंचायतीने का ताब्यात घेतले नाही ? असा सवाल उपस्थित करताच मुख्याधिकारी यांनी नकार दिला . यावर त्या योजनेत भ्रष्टाचार झाला का ? तीस वर्षाच्या नियोजनाने निर्माण झालेली योजना 12 वर्षापासून ताब्यात न घेता सभागृहाला नविन पाणीपुरवठा योजना मंजुरीची नामुष्की का ओढवली? याचा सभागृहाने विचार करुन संबंधीत ठेकेदार किंवा पाणीपुरवठा समितीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करण्यात आली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसीत करून पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा बसविण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. सुज्ञ नागरीक लक्ष्मण सापधरे यांनी सभा सुरू होतांना किंवा आटोपतांना राष्ट्रगीत म्हणावे असे विनंती पत्रक नगरपंचायतीला दिले होते. त्यावर सभागृहात चर्चा होऊन राष्ट्रगीताबाबत सर्वानुमते ठरले. सभा आटोपताच सर्वांनी सभागृहात राष्ट्रगीत म्हटल्यानंतर सभेची सांगता झाली.