मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांत दुष्काळ जाहीर!

0

राज्यात ८ तालुक्यात दुष्काळ जाहीर
विदर्भ-उत्तर महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश

मुंबई (निलेश झालटे) – जलयुक्त शिवार सारख्या योजनेचा बोलबाला मोठ्या प्रमाणात केल्यानंतरही राज्यामधील दुष्काळाचे संकट निवारण्यात सरकार आणि प्रशासनाला यश मिळालेले नाही. राज्यातील तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून यात जळगाव जिल्हातील माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्याला देखील दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. राज्यातील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात असला तरीही मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असताना देखील मराठवाड्यातील एकाही तालुक्याचा समावेश यात करण्यात आलेला नाही.

यवतमाळ जिल्ह्यात स्थिती गंभीर
राज्यातील ८ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला आहे. २०१७- १८ च्या रब्बी हंगामासाठी यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव, दिग्रस, घांटजी, केळापूर व यवतमाळ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड, आणि वाशिम जिल्ह्यातील वाशिम या आठ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस तसेच भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करून प्रभावीत झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्यातील ८ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

खडसेंच्या मागणीला अखेर न्याय
– अधिवेशनामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर, बोदवड आणि अमळनेर या तीन तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती घोषित करण्याबाबत आक्रमक भूमिका घेत चांगलेच धारेवर धरले होते. तीन तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला होता. मी सप्टेंबरपासून मदत मागतोय, दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा अशी विनंती केली, पण सरकारने काहीही केले नाही असे सांगत सरकार मदत करत नाही तर लोकांनी मरायचं का? असा खडा सवाल खडसे यांनी उपस्थित केला होता.

आठ तालुक्यांना मिळणार या सवलती
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्याला जमीन महसूलात सुट मिळणार असून सरकारी कर्जाचे पुर्नगठन होणार आहे. तसेच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सुट मिळणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता दिली जाणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सची सोय, शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, मध्यान्ह भोजन योजना दिर्घ मुदतीच्या सुटीच्या काळातही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने रब्बी २०१७-१८ च्या हंगामात तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना व मदत जाहीर केली आहे. संबंधित तालुक्यात तातडीने आठ सवलती लागू करण्यात आल्या असून शेतपिकांच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे.

तातडीने दिलासादायी उपाययोजना राबवाव्यात
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रचलित पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, जलविषयक निर्देशांक आणि पीक पाहणी या गोष्टी विचारात घ्याव्यात अशा सूचना आहेत. तीव्रतेनुसार गंभीर दुष्काळ, मध्यम दुष्काळ आणि सामान्य स्थिती असे दुष्काळाचे वर्गीकरण केले जाते. या ८ तालुक्यात तातडीने दिलासादायी आठ उपाययोजना राबवाव्यात असे आदेश मदत आणि पुर्नवसन विभागाने जारी केले आहेत.