उमेदवारीबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील-ना.महाजन
जळगाव-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाचीच आहे.भाजपकडेच राहणार असून उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि आमदार खडसे यांच्याबाबत योग्य निर्णय होईल अशी माहिती पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे.या यादीत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.यासंदर्भात पालकमंत्री ना.महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की,भाजपची पूर्ण यादी अद्याप झालेली नाही. गुरुवारी पूर्ण यादी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करुन मुक्ताईनगर भाजपाकडेच राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ.एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारी संदर्भात विचारले असता,त्यांनी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगितले. तसेच रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा मी देखील ऐकली असल्याचेही ते म्हणाले.
आमदार राजूमामा भोळे आज अर्ज दाखल करणार
जळगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे उद्या दि.3 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.सकाळी 9 वाजता जी.एम.फांउडेशन येथे एकत्र येवून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थिीतीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
पक्षविरोधी काम करणार्यांवर कारवाई
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती झाली आहे.ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील त्या ठिकाणी शिवसेना प्रचार करेल तर ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी भाजप प्रचार करेल. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांविरुध्द जो काम करेल किंवा बडखोरी करेल त्यांच्यावर पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सजीव पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.