मुक्ताईनगर येथील अंगणवाडी भरती मध्ये गैरप्रकार… प्रभारी सीडीपीओ यांचा पदभार काढावा आमदारांची थेट जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे मागणी.
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी दि.११ ऑगष्ट २०२३ रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अनिकेत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोदी आवास योजनेअंतर्गत आढावा बैठक पार पडली . घरकुल, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळावरून भ्रष्टाचाराच्या आरोप प्रत्यारोपावरून बैठक वादळी ठरली. प्रभारी सीडीपीओ यांचा पदभार काढून घेण्याची सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तसेच बैठकीत मुक्ताईनगर येथील तलाठी कार्यालय जागेत उभारण्यात आलेल्या अपूर्ण बहुउद्देशीय व्यापारी संकुल चे इतर ठिकाणच्या बिल्डिंग चे फोटो दाखवून बिले काढून अफरातफर केली असल्याचे दस्ताऐवजावरून समजते तरीही कारवाई का नाही ? असा सवाल तक्रारदार संजय कांडेलकर यांनी उपस्थित केला ? यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोटचेपी भूमिका घेत उत्तर देणे टाळले यावेळी पत्रकारांनी पुन्हा खुलासा मागितला असता उडवाउडवीची उत्तरे दिली यावर आमदारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीवरून यासंदर्भात चर्चा करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.
पंचायत समिती स्तरावरील आज अखेरीस सुमारे 2100 घरकुल प्रलंबित आहेत. त्यामुळे मोदी आवास योजनेची नव्याने आखणी करताना येथे रोहयो ऑपरेटर एकमेव असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावरील घरकूल तसेच इतर रोहयो ची कामे करणे मुश्किलीचे होईल याकरिता येथे रोहयो ऑपरेटर ची संख्या वाढवावी अशी सूचना आमदारांनी बैठकीत केली.तसेच राजुरे येथील आर सी सी चे पक्के बांधकाम असताना एकाच घरावर तीन घरकूले मंजूर केली नव्हे नव्हे बिलेही काढली याची तक्रार २०१८ पासून करतोय परंतु दोषींवर अद्यापही कार्यवाही नाही असा तक्रारदाराने बैठकीत प्रश्न उपस्थित केला. यावरही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपेक्षित उत्तर दिले नाही.
तालुक्यात नुकत्याच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली परंतु या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. तसेच काही उमेदवारांनी बैठकीत येत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील भोंगळ कारभाराचा लेखाजोखा च मांडला तर काही उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याची २० तारीख असताना २१ तारखेला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कागदपत्रे घेतल्याचा आरोप केला. तसेच पैशाची मागणी केल्याचा आरोपही महिला उमेदवार यांनी केला यावर प्रभारी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी मेश्राम यांनी आपण कोणतेही पैसे घेतले नसून बैठकीमध्ये आमदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तक्रारदारांना चपलेने मारून ॲक्ट्रासिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी च दिली यावर आ.पाटील यांनी आपण महिला अधिकारी असून आपल्याला असे बोलणे शोभत नाही. तात्काळ आ पाटील यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राऊत यांचेशी भ्मणध्वनीवरून बोलून श्रीमती मेश्राम यांचा तात्काळ पदभार काढून घ्यावे असे सांगितले. तसेच भरती प्रक्रियेत अर्थपूर्ण सावळा गोंधळ झाल्याचे आरोप प्रत्यारोप होत असल्याने सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात येवून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली.
यावेळी बैठकीमध्ये गटविकास अधिकारी निशा जाधव , विस्तार अधिकारी वाय आर अढागडे, माजी उपसभापती अनंतराव देशमुख, महेंद्र मोंढाळे(कोळी) , बालविकास अधिकारी श्रीमती मेश्राम यांचेसह अफसर खान, पंकज राणे , आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
@@@– डेप्युटी सीईओ पोहोचले नगरपंचायतीमध्ये…. बैठकीमध्ये मुक्ताईनगर येथील बहुउद्देशीय व्यापारी संकुलाच्या गैरव्यवहार संदर्भामध्ये संजय कांडेलकर यांनी प्रश्न उपस्थित केल्याने डेप्युटी सीईओ अनिकेत पाटील हे मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये पोहोचले तेथे त्यांनी व्यापारी संकुल संदर्भातील अभिलेख याची पाहणी केली तसेच गेल्या आठ वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेवरही जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे तसेच संजय कांडेलकर उपस्थित होते.
@@@–बैठकीत न आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस द्या… आमदार पाटील.
शुक्रवारी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पंचायत समिती विभागातील सर्व विभागाचे एच ओ डी तसेच कर्मचारी यांना बैठकीत उपस्थित राहण्याचे सांगितले होते परंतु बैठकीमध्ये बहुतांश विभागाचे एचओडी व कर्मचारी उपस्थित नव्हते यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करीत गैरहजर असणाऱ्या ंना नोटीस पाठवा अशा सूचना गटविकास अधिकारी यांना केल्या.
@@@–मुक्ताईनगर पंचायत समिती मधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत. अधिकारी कर्मचारी पदभार घेत नाही असे बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगताच आमदार पाटील यांनी आता काय युपी बिहार वरून कर्मचारी मागवायचे का असा संतप्त सवाल केला.
@@@… ग्रामविकास मंत्र्यांसोबत लवकरच बैठक… बैठकीमध्ये मुक्ताईनगर येथील आठ वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या बहुउद्देशीय व्यापारी संकुलाविषयी प्रश्न उपस्थित झाल्याने लवकरच ग्रामविकास मंत्री यांचे समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.