मुक्ताईनगरात शंभर खाटांच्या श्रेणी वर्धन प्रस्तावास मान्यता
आमदार चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परीषदेत माहिती
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटांच्या श्रेणी वर्धन प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे तर मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड रावेर तालुक्यात सह शेजारील मलकापूर व जामनेर तालुक्यांना देखील या रुग्णालयाचा फायदा होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परीषदेत दिली. याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, नगरसेवक संतोष मराठे, निलेश शिरसाठ, आरीफ आझाद, नूर मोहम्मद आणि युनूस खान उपस्थित होते.
शंभर खाटांच्या श्रेणी वर्धन प्रस्तावाला मान्यता
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय हे पूर्वी 50 खाटांचे होते. मुक्ताईनगर हे तालुक्याचे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तसेच इंदोर औरंगाबाद या दोन महामार्गावर आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बाहेर गावाहून उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या, महामार्गावर दररोजचे होणारे अपघात त्यामुळे येथे दररोजचे रुग्ण व अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे पुरेशी सेवा सुविधा करून देणे उपलब्ध होत नाही त्यामुळे पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवावे लागते त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथील शंभर खाटांच्या श्रेणीवर्धन प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू होता. या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाल्याने मतदारसंघातील आरोग्याच्या समस्या सुटणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
या सुविधा मिळणार
अति दक्षता विभागासाठी स्वतंत्र शाखा उभारण्यात येईल, कर्मचार्यांची संख्या 45 वरून 108 होईल, नाक कान घसा तज्ञ, त्वचा तज्ञ, हाडांचे रोग, उपचार डोळ्यांचे उपचार तज्ञ असे एकूण सहा नवीन वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरण्यात येणार असून शस्त्रक्रियादेखील या ठिकाणी करण्यात येणार आहे व शासकीय अनुदान देखील त्यासोबत उपलब्ध होणार आहे जिल्हा रुग्णालयाच्या समतुल्य अशा सर्व सोयी या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी मिळणार असून ब्लड स्टोरेज युनिट तंत्रज्ञानासह उपलब्ध होणार आहे.
पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी
मुक्ताईनगर शहरासाठी 26 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवली आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ही योजना मंजूर करण्यात आली असून वाडी व मान्यतेसाठी प्रयत्न केला जात आहे शिरपूर धर्तीवर आधारीत सेट लिंक टँक सह इतर सुविधांसाठी पाणीपुरवठा योजना वाढीव निधीद्वारे जवळपास पन्नास कोटी मंजूर करण्याचा आपला मानस असल्याचे याप्रसंगी आमदार पाटील व पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे यांनी सांगितले.