मुक्ताईनगर। शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयातील मॉडेम जळाल्याने शनिवार 1 रोजी पासून पोस्टल सेवा कोलमडली आहे. यात तातडीचे रजिस्टर व मनी ट्रान्स्फर सेवा पूर्णत: ठप्प आहे. नागरिकांना बँकेचे चेकबुक, महत्वाचे टपाल मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
टपाल विभागाने काही दिवसांपासून संगणकीय प्रणालीचा अवलंब केला आहे. शनिवार पासून पोस्ट कार्यालयातील इंटरनेटसाठी वापरण्यात येणारे मॉडेम जाळले आहे. यामुळे ऑनलाइन प्रणालीवर आधारित दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे रजिष्टर सेवा, मनीट्रान्सफर सेवा, आदान प्रदान सेवा ठप्प झाल्या आहेत. तसेच पार्सल सेवाही ऑनलाईन असल्यामुळे इंटरनेट सुविधा सुरु झाल्याशिवाय पार्सल सुद्धा नागरीकांना पोहोचलेले नाहीत. बँकेने टपालद्वारे पाठविलेले चेकबुक वेळेवर मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहे. यासंदर्भात पोष्टमास्तरांनी वरीष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करुनही वरिष्ठ स्तरावरून काहीच हालचाल झालेली नाही.