जळगाव । शेतकर्याची बँक असताना त्यांनाच तातडीचे पीककर्ज देण्यासाठी नकार देण्यात येत आहे. परिस्थिती नसताना मुक्ताई साखर कारखान्याला 51 कोटी मंजूर झाले कसे? असा प्रश्न विचारत जिल्हा बँकेच्या पीककर्ज वाटपाच्या भूमिकेवर जलसंपदामंत्री जिल्हा बँकेचे संचालक गिरीश महाजन यांनी आक्षेप नोंदवला आहे. अकोला जिल्हा बँकेने राज्यशासनाने दिलेल्या आदेशानुसार पीककर्ज देण्याला सुरुवात केली. मात्र जळगाव जिल्हा बँकेने अद्याप कर्ज दिले नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
म्हणून ते काहीही करतील काय?
जिल्हा बँकेचा संचालक म्हणून मुक्ताई साखर कारखान्याला कर्ज देण्यास मी विरोध केला, त्यावर ठाम आहे. शेकर्यांची बँक असताना त्यांना नाकारून खाजगी कारखानदारांना कर्ज देणे योग्य नाही . शेतकर्याशी यांना काही देणे घेणे नाही. जिल्हा बँकेत येणे- जाणेे हा माझा निर्णय आहे. राज्याचा मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामे करावी लागतात. म्हणून संचालक काहीही करतील काय ? शेतकरी आमच्यासाठी महत्वाचा असून यासंदर्भात लेखी तक्रार सहकार विभागाला केली असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले आहे.
100 टक्के कारखाने आजारी
जिल्ह्यातील खाजगी कारखाने आजारी असताना त्यांना कर्ज देणे योग्य नाही. काही कारखाने विक्रीला निघाले आहेत. मुक्ताई साखर कारखानाच्या जाधव यांना कागदोपत्री 51 कोटी मंजूर असून त्यांच्यावर इतके प्रेम का ? असा प्रश्न देखील मंत्री महाजन यांनी उपस्थित केला. शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट असताना त्यांना आता द्यायला पैसा नाही असे सांगितले जाते. मालक म्हणून संचालक ठरवतील तसे कर्ज देणे चुकीचे आहे, असेही ना. महाजन म्हणाले.
शेतकर्यांच्या संसाराची राख नको
राज्यात सगळ्याच जिल्हा बँका शेतकर्यांना पीककर्ज देत असून जळगावमध्ये मात्र अनास्था आहे. राजकीय हेतूने सगळे कारस्थान सुरु आहे. हा खेळ वर्षभरापासून सुरु असून कर्ज पुनर्गठनासाठी पाठपुरावा केला होता. ते केले असते तर बँकेची परिस्थिती चांगली राहिली असती. ना. गिरीश महाजन यांना शेतकर्यासाठी काही करायचे असल तर त्यांनी सरकार म्हणून आपले कर्तव्य बजावावे, जिल्हा बँकेकडे शेतकरी आशेने बघत असताना आता दुर्लक्षित केले जात आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी यासाठी आंदोलने केली होती. त्यामध्ये जिह्यातील सत्ताधारी नेत्यांचा समावेश आहे. ज्यांना राजकारण करायचे असेल त्यांनी करावे पण शेतकर्याच्या संसाराची राखरांगोळी करू नका.
– ए.बी.पाटील – किसान क्रांती
बँकेची परिस्थिती नाही
सहकार आयुक्त यांनी 16 जिल्हा बँका आजारी असल्याचा अभिप्राय दिला आहे. व्यापारी बँकांना शेतकर्याना कर्जवाटपासाठी अधिकार देण्यात आले. अकोला जिल्हा बँकेने शेतकर्याना कर्ज वाटप केले. अकोल्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांनी त्यांच्या अधिकारात कोणते कर्ज दिले त्याची माहिती नाही. मात्र जळगाव जिल्हा बँकेची सद्यस्थिती पाहता कर्जवितरणाची शक्यता कमीच असल्याचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
– आमदार किशोर पाटील