मुक्ताईनगर । माघ कृष्ण एकादशीला सुरुवात झालेल्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या यात्रोत्सवात 200 च्या वर दिंड्यानी श्री क्षेत्र मुक्ताईनगर व कोथळी स्थित नवीन व जुन्या मंदिरात टाल मृदंगच्या गजरात हजेरी लावून मुक्ताईचे दर्शन घेतले. तसेच आलेल्या भाविकांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम, मुक्ताई शरणम् मुक्ताई शरणम्, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम’ असा जयघोष केल्याने संपुर्ण मुक्ताईधाम दुमदुमल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. महाराष्ट्रातील कानाकोपर्यासह मध्यप्रदेशातील खांडवा तसेच बुर्हाणपूर जिल्ह्यातील पायी दिंड्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. नवीन मुक्ताई मंदिरावरच जवळपास 150 दिंड्यांचे फड पडले असून समोर फडावर भजन व कीर्तन सोहळे सुरु आहेत.
सकाळी करण्यात आली महापूजा
मंदिरात सकाळीच जुनी मुक्ताई मंदिरात महानंदच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड. रोहिणी खेवलकर व त्यांचे पती डॉ. प्रांजळ खेवळकर यांचे हस्ते महापूजा करण्यात आली. तर संस्थानचे मानकरी म्हणून अॅड. रवींद्र पाटील यांचे हस्ते अभिषेक करण्यात आला.
चोख पोलीस बंदोबस्त
एकादशीच्या या सोहळ्याला दरवर्षाप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने भाविकांची अलोट गर्दी याठिकाणी उलटली होती. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरीता सतर्कता म्हणून पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा उत्सव 25 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून काल्याच्या कीर्तनाने उत्सवाचा समारोप होणार आहे. संपूर्ण महाशिवरात्रोत्सवात दिंडीचालकांची कीर्तने होणार आहे. याप्रसंगी मेहूण-चिंचोल ग्रामस्थांतर्फे मोफत फराळाचे वाटप करण्यात आले.
काल्याच्या कीर्तनाने समारोप
याप्रसंगीे अभिषेक आणि महापुजेला संदीप पाटील, हभप रवींद्र हरणे व हभप उद्धव जुनारे व विनायक व्यवहारे उपस्थित होते. नवीन मुक्ताई मंदिरात मीना पाटील यांचे हस्ते महापूजा करण्यात आली. सकाळी दिलीप महाराज यांचे प्रवचन तर रात्री पंढरपूरचे हभप निवृत्ती महाराज वक्ते यांचे कीर्तन संपन्न झाले. यामध्ये महाराजांनी भाविकांना भक्तीचा महिमा वर्णन केला. त्यांनी सांगितले की, ईश्वरप्राप्तीसाठी जीवनात भक्तीला महत्वाचे स्थान आहे.