मुक्ताई अभयारण्य निर्मितीची घोषणा : व्याघ्र प्रकल्प निर्मितीचा मार्ग मोकळा
गेल्या दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला स्वल्पविराम : यावल आणि मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार
मुक्ताईनगर (संदीप जोगी) : राज्य शासनाने सोमवारी मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राला अभयारण्य निर्मितीची घोषणा केली असून गेल्या दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता स्वल्पविराम मिळाला आहे. अभयारण्यांच्या निर्मितीनंतर एकत्रीतपणे यावल आणि मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.
व्याघ्र संवर्धनाच्या प्रक्रियेला गती मिळणार
डोलारखेड्यात गाभाक्षेत्र (कोअर झोन) निर्माण करून सर्व सभोवतालच्या वनक्षेत्रात आणि गावांमध्ये बफर झोन निर्माण करून या गावांच्या आणि तेथील लोकांच्या सर्वंकष विकासाची योजना आखण्यात यावी, या अनुषंगाने शासकीय आणि अशासकीय स्तरावर विचार करून सर्वंकष योजना आणि आराखडा तयार करण्याची आता नितांत आवश्यकता आहे तरच व्याघ्र संवर्धनाच्या प्रक्रियेला खान्देशात आणि पश्चिम सातपुड्यात गती मिळेल आणि पर्यटन विकास आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊन ताडोबानंतर जळगाव जिल्हाही व्याघ्र संवर्धनात जगाच्या नकाश्यावर येईल. ज्याप्रमाणे भारतात सर्वत्र वाघांची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे पश्चिम सातपुड्यातही वाघांची संख्या वाढू शकेल आणि हेच वाघ पुढे गुजरात आणि सह्याद्रीत जातील. स्वाभाविकपणे येथील वनक्षेत्र पुन्हा एकदा समृद्ध होणार आहे.
महाराष्ट्र राज्य ठरले पहिले
महाराष्ट्र शासनाने वन्यजीवन आणि वनसंवर्धनाची प्रक्रिया गतिमान केलेली आहे. राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याच्या अनुरूप राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. दुसरे अत्यंत महत्वाचे पाऊल म्हणजे जैवविविधता आणि वन्यजीवनाचे अस्तित्व असलेल्या वनक्षेत्राला संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करणे आणि विद्यमान संवर्धन राखीव क्षेत्रांना अभयारण्य घोषित करणे आणि या सर्व विस्तृत क्षेत्रांना वन्यजीव संचार मार्गांशी जोडणे, या दृष्टिकोणातून व्यापक कृती योजना आखण्यात आलेली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या 4 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत 10 संवर्धन क्षेत्राच्या प्रस्तावना मान्यता देण्यात आली आणि 5 ऑगस्ट 2021 रोजी शासनाने अतिशय महत्वाचे परीपत्रक काढले ते म्हणजे विद्यमान 14 राखीव संवर्धन क्षेत्रातील काही भागांना अभयारण्ये घोषित करण्यासाठी उपसमित्या नेमण्यात आल्या. या सामित्यानी प्रत्यक्ष या संवर्धन क्षेत्रात जाऊन लोकांशी आणि संस्थांशी संवाद साधून आपले अहवाल तयार केले आहेत.
यांचा समितीत समावेश
या समितीत अध्यक्ष नितीन गुदगे (मुख्य वन संरक्षक, प्रादेशिक, नाशिक), तुषार चव्हाण- सदस्य सचिव (उप वन संरक्षक, प्रादेशिक, नाशिक), डी.थ.पगार, विवेक होशींग, किशोर रीठे, रोहिदास डगळे, विश्वास करदरे, अभय उजागरे, राजेंद्र नन्नवरे, राजेश ठोंबरे, रवींद्र फालक, विवेक देसाई यांचा समावेश होता. या समितीने सर्व महत्वपूर्ण गावांना भेटी दिल्या आणि कुर्हा येथे जनसभा/सुनावणी घेतली. या सभेला अत्यंत उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या समितीने आपला सकारात्मक अहवाल राज्य वन्यजीव मंडळाकडे पाठविला होता.