मुक्ताईनगर- श्री संत आदिशक्ती मुक्ताईरचित साहित्य प्रथमच स्वतंत्रपणे सार्थ स्वरूपात उपलब्ध होणार आहे. श्री क्षेत्र मेहुण-चिंचोल येथील अॅड.गोपाल दशरथ चौधरी यांनी अतिशय साध्या, सोप्या, सहज व प्रवाही भाषाशैलीत अभंगांचा अर्थ सांगितला आहे. मुक्ताई लुप्त होण्याला यंदा 722 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत मुक्ताईचे साहित्य विखुरले गेले. अनेक संतांच्या गाथ्यांमध्ये मुक्ताई रचित साहित्याचा समावेश करण्यात आला. अनेकांनी संत मुक्ताई जीवनपट व साहित्य यावर संशोधनही केले परंतु इतर संतांचा ज्याप्रमाणे स्वतंत्र गाथा आहे तसा मुक्ताईचा स्वतंत्र गाथा आणि तोही सार्थ स्वरूपात आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही. ही बाब मनाशी बाळगून गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर संकलन, संशोधन व अभ्यास करत मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण – चिंचोल येथील गोपाल दशरथ चौधरी यांनी संत मुक्ताई रचित तब्बल 257 अभंग संकलित केले आणि त्याचा सहज व सुलभ अर्थदेखील मुक्ताई गाथ्यात सांगितला आहे. त्यामुळे एकाच पुस्तकात स्वतंत्ररित्या मुक्ताईंची रचना सार्थ स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
19 मे रोजी ग्रंथाचे प्रकाशन
वारकरी संप्रदायात संत आदिशक्ती मुक्ताबाई यांची ‘नित्य मुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते, आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते’ अशी जी आरती म्हटली जाते ती आरती ‘दाशरथी’ या टोपणनावाने गोपाल चौधरी यांनीच रचली आहे. त्यांनीच अतिशय अभ्यासपूर्ण श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा सार्थ स्वरूपात लिहिला आहे. तसेच या गाथ्यात श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांचे चरीत्र भुसावळ येथील डॉ.जगदीश पाटील यांनी लिहिले आहे. अशा पद्धतीने प्रथमच इतर संतांप्रमाणे संत मुक्ताईंचा गाथा सार्थ स्वरूपात प्रथमच स्वतंत्ररीत्या उपलब्ध होणार आहे. या ग्रंथाचे प्रकाशन येत्या 19 मे 2019 रोजी सकाळी 8 वाजता श्रीक्षेत्र मेहुण-चिंचोल येथील श्रीयज्ञेश्वर आश्रमात करण्यात येणार आहे.