मुक्ताई साखर कारखान्याला 81 कोटीचे नियमबाह्य कर्ज देण्याचा घाट: पाटील

0

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा साखर कारखान्याला जिल्हा बँक कर्ज देत नाही, मधुकर सहकारी साखर कारखान्याला जेमतेम कर्ज दिले जात आहे. मग खाजगी कारखाना असलेल्या संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड लि. घोडसगाव ता. मुक्ताईनगर यांना आजच्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत 81 कोटी रूपयांचे नियमबाह्य कर्ज मंजुरीचा घाट घातला जात असल्याचा आरोप आ. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ताई साखर कारखाना सुमारे 39 कोटी रुपयांना राज्य बँकेकडून घेण्यात आला आहे. तीन वर्षा पूर्वी वीज निर्मीती कारखान्यात होणार यासाठी 51 कोटी कर्ज मागणीचा विषय संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आला. कारखान्याने 30 कोटी कर्ज उचल केले होते. नंतर मागच्या सभेतदेखील 8 कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहेत. पुन्हा आज ( दि.10 रोजी)संचालक मंडळाच्या सभेत 81 कोटी कर्ज मागणीचा विषय अजेंड्यावर ठेवण्यात आला आहे. ऐकीकडे सहकारी कारखान्याला कर्ज दिले जात नाही. मसाकाच्या संचालकांनी कारखाना वाचविण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केलेत. अजून ही थकहमी मिळाली नाही, उलट हा कारखाना बंद कसा होईल आणि या परिसरातील ऊस खाजगी कारखान्याला कसा मिळेल हे पाहिले जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानावरदेखील हा विषय टाकला असल्याचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी गजानन मालपूरे उपस्थित होते.

नाथाभाऊ समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल : एकनाथराव खडसे

आ. चंद्रकांत पाटील यांना जिल्हा बँक, सहकारी संस्था, साखर कारखाने व नाथाभाऊ समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल, असा टोला भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे. कारखान्याला कायदेशीर कर्ज मंजूर झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.