मध्य प्रदेशनंतर छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी !

0

भोपाळ : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन तासांतच मध्य प्रदेशात कमलनाथ यांनी सरसकट शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. त्यापाठोपाठ छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच कर्जमाफीची घोषणा केली.

कॉंग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात दहा दिवसात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. ते कॉंग्रसने तंतोतंत पाळले.

काल तीन राज्यात कॉंग्रसच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. या तिन्ही शपथविधी सोहळ्यांना उपस्थित राहून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीचा संदेश दिला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत कृषी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कृषी कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीच्या प्रस्तावावर कमलनाथ यांनी स्वाक्षरी केल्यानंतर शेतकरी कल्याण व कृषी विकास विभागाचे प्रधान सचिव राजेश राजोरा यांनी या संदर्भातील आदेश जारी केला.

कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी उपस्थित होते.