मुख्यमंत्री आल्याशिवाय माझे प्रेत जाळू नका

0

सोलापूर । मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून वीट (ता. करमाळा) येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे शेतकर्‍यांचा संप सुरू असताना करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेने शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त झाला. संतप्त शेतकर्‍यांनी करमाळा पोलिसठाण्याला घेराव घातला होता. पालकमंत्र्यांनाही ते ऐकत नव्हते. बराच वेळ करमाळ्यात तणाव पसरला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून कुटूंबियांशी बातचित केली आणि मगच आंदोलन मागे घेण्यात आले.

बँक आणि सावकाराच्या कर्जाने त्रस्त
धनाची चंद्रकांत जाधव (वय 45) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. वीट येथील जांभूळझरा येथील वस्तीवर राहणारे धनाजी चंद्रकांत जाधव यांच्यावर सावकार व बँकेचे कर्ज होते. धनाजी यांनी शेतकरी संपात व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्ती लगत असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशातून चिठ्ठी निघाली असून त्या चिठ्ठीत जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत मला जाळायचे नाही असे स्पष्टपणे लिहिले आहे. आत्महत्या केलेले शेतकरी धनाजी जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगा बारावी व दुसरा दहावीला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना वीटमध्ये धनाजी चंद्रकांत जाधव याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धनाजी जाधव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात रात्री उशिरा आणण्यात आला.

जाधव यांनी चिठ्ठीत लिहले आहे की, मी एक शेतकरी आहे, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे माझी मुले योगीराज व युवराज यांचा संभाळ नीट करावा म्हणुन चार मित्रांची नावे टाकली आहे. मी गेल्यानंतर माझे प्रेत गावात घेऊन जावा आणी जो पर्यत माझे व माझ्या मित्रांचे कर्ज फीटत नाही तोपर्यत मला जाळु नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतरच माझा अंत्यविधी करावा असा उल्लेख त्यांनी चिठ्ठी मध्ये केला आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
वीट गावातील नागरिकांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री राहूदे पण किमान पालकमंत्री तरी आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य पाहून सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे तातडीने करमाळ्यात दाखल झाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. वीरेश प्रभू हेदेखील करमाळा येथे आले. या घटनेनंतर करमाळावासियांनी ‘बंद’ पाळत ‘रास्ता रोको’ आंदोलन करून करमाळा -अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. करमाळा येथे पालकमंत्री विजय देशमुख हे दाखल झाल्यानंतर त्यांना शेतकरी ग्रामस्थांनी घेराव घालून मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी फोनवर संवाद साधला.

खटावच्या शेतकर्‍याचीही आत्महत्या
सोलापूरच्या करमाळामधील धनाजी जाधव या शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर सातार्‍यातही एका शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात चिलारेवाडी इथल्या शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केलीय. सुभाष शिंगाडे असे या शेतकर्‍याचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान सुभाष शिंगाडे यांचा मृत्यू झालाय. त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज होते. याच विवंचनेतून त्यांनी आपला जीवनप्रवास संपवलाय.

कर्जमाफीसाठी शेतकरी फास घेऊन चढला झाडावर
दुसरीकडे बीड जिल्ह्यातील त्र्यंबक तोडकर हा शेतकरीदेखील हातात फास घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढला. यावेळी त्यांनी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचीही मागणी केली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने काँग्रेसचे नेते विठ्ठल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला व इतरांच्याही नजरेस आणून दिला. यामुळे अनर्थ टळला. विठ्ठल जाधव यांनी तोडकर यांनी खाली येण्यास विनंती केली. पण सुरुवातीला त्यांनी नकार देत प्रशासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. यानंतर काही वेळानं तेथे महसूल विभागाचेही कर्मचारी दाखल झाले. बर्‍याच प्रयत्नानंतर व विनवणी केल्यानंतर अखेर त्र्यंबक तोडकर झाडावर खाली उतरले व सर्वांचा जीव भांड्यात पडला.