मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर काँग्रेस नेत्यांचे प्रश्नचिन्ह

0

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनीही राज्य सरकारवर टीका करत चव्हाणांनाही टोला लगावला आहे.

एकीकडे नोकरवर्ग महामारीच्या संकटाचा सामना करत आहे पण दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासकीय नेतृत्वाचा अभाव असल्याचे दिसून येते अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात काही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्तीसाठी रखडले आहेत. तर काही अधिकार्‍यांना दोन-दोन कामे दिली आहेत. या अधिकार्‍यांची योग्य जागी नियुक्ती करणे हे मुख्यमंत्र्यांचे पहिले काम आहे. अधिकार्‍यांची योग्यता आणि अनुभव लक्षात घेऊन त्यांना योग्यठिकाणी नियुक्त करावं त्यामुळे राज्याला लाभ होईल. राज्यात १० आयएएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्याकडे काहीच काम नाही असे त्यांनी सांगितले. सचिव स्तरावरील अधिकार्‍यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, मी राज्य सरकारवर टीका करत नाही. मी जे बोलतोय ते सकारात्मक दृष्टीने घ्यावे. मी आमच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे असे पाहू नये असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. यानंतर निरुपम यांनीही सरकावर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबईत कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ४७ लोकांचा जीव गेला. दर २ तासाला २ मुंबईकरांचा मृत्यू होत आहे. शनिवारी एकाच दिवशी ८८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. प्रत्येक तासाला ३७ रुग्ण सापडत आहेत. या अपयशाची जबाबदारी कोणी घेईल का? कुणाला तरी बलिदान द्यावे लागेल. मंत्री अथवा बाबू? असे त्यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यानुसार शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार कोरोनाला तोंड देण्यासाठी अपयशी ठरले आहे. पण या अपयशाला जबाबदार कोण हे सांगितलं नाही. हे तेच चव्हाण साहेब आहेत ज्यांनी शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचा सुवर्ण विचार मांडला होता असा टोला संजय निरुपम यांनी चव्हाणांना लगावला आहे.