विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालबाग चौकात जाहीर सभा ; राष्ट्रवादीचे पदाधिकारी दाखवणार काळे झेंडे
रावेर (शालिक महाजन)- मध्यप्रदेशातील बर्हाणपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने कमळ फुलवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली असून विधानसभा निवडणुकीच्या रींगणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी सकाळी 10 वाजता लालबाग जवळील सागर टॉवरमैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. सलग तिनवेळा विजयी झालेल्या महिला व बालविकास मंत्री अर्चना चिटणीस व नेपानगर मतदारसंघातील इच्छूक उमेदवार मंजु राजेंद्र दादू यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे. बर्हाणपूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे त्यामुळे आगामी काळातही भाजपाचे वर्चस्व टिकून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लागले लक्ष
बर्हाणपूर, रावेर, यावल, चोपडा दरम्यान मंजूर असलेला मेगारीचार्ज प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून मध्यप्रदेश्यात सुध्दा जलपातळी खालावली आहे. अशा स्थितीत मेगा रीचार्ज प्रकल्पाला वेगाने चालना देण्यासाठी मुख्यमंत्री काय बोलतात? याकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
चिटणीस सलग चौथ्यांदा तर दादू दुसर्यांदा रींगणात
2003 च्या निवडणुकीत नेपानगर तसेच 2008 व 2013 च्या निवडणुकीत अर्चना चिटणीस या भाजपाकडून निवडून आल्या आहेत तर 2018 च्या निवडणुकीत त्या पुन्हा मतदारांकडे कौल मागत आहेत शिवाय नेपानगर मतदारसंघातील इच्छूक उमेदवार मंजु राजेंद्र दादू या दुसर्यांदा निवडणूक रणांगणात उतरल्या आहेत. स्व.राजेंद्र दादू यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली मात्र 2015 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत मंजू दादू यांना मतदारांनी कौल दिल्याने त्या विजयी झाल्या होत्या तर या निवडणुकीत त्या पुन्हा भाजपातर्फे उमेदवारी करीत आहेत.
भाजपा पदाधिकार्यांनी पिंजला मतदारसंघ
बर्हाणपूरसह नेपानगर या मतदारसंघात मराठी लोकांच्या मतांचा प्रचंड प्रभाव असल्याने दोघे ठिकाणी विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून चांगलीच कंबर कसण्यात आली आहे. याधीच गुजरातचे मराठा लोकप्रतिनिधी खासदार सी.आर.पाटील, आमदार संगीता पाटील, भाजपा महिला अध्यक्षा वैशाली पाटील, नगरसेवक अमितसिंग राजपूत हे मागील सात दिवसांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत तर मराठी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शनिवारी थेट मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी काळे झेंडे दाखवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत काळे झेंडे दाखविणार असल्याचे राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील म्हणाले. मागील पाच महिन्यांपूर्वी बर्हाणपूर जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात वादळाने लाखो हेक्टरवरील केळी जमीनदोस्त झाली होती. त्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शेतकर्यांना हेक्टरी एक लाखाची मदत केली होती तर इकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना हेक्टरी 13 हजार 500 रुपये अल्प मदत दिल्याने एक प्रकारे महाराष्ट्राच्या शेतकर्यांवर अन्याय झाल्याने शनिवारच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निवेदन देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी किसान सभेतर्फे देण्यात आली आहे.