नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रविवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुपारी १२ च्या सुमारास ते एअर अॅम्ब्युलन्सने गोव्याकडे रवाना झाले असून लवकरच ते गोव्यात पोहोचतील असे सुत्रांकडून कळते. दरम्यान, पर्रिकरांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याने त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात एम्समधील दर्जाचेच उपचार केले जाणार आहेत. त्याची तयारीही गोव्यातील प्रशासनाच्या वतीन करण्यात आली आहे.
एम्स सुत्रांच्या माहितीनुसार, सकाळी पर्रिकरांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना काही काळ आयसीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही वेळाने रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. ६२ वर्षीय पर्रिकरांना १५ सप्टेंबरपासून दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडलेली असल्याने बऱ्याच काळापासून गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात पर्रिकरांना उपस्थित राहता आलेले नाही. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत सरकारचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी शुक्रवारी त्यांनी गोवा भाजपाच्या कोर कमिटीची तसेच सहकारी पक्षांची बैठक एम्समध्ये बोलावली होती.