मुंबई – तामीळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलनीसामी यांचे सरकार बडतर्फ करावे तसेच त्यांच्याविरूद्ध तसेच त्यांच्या १० सहकाऱ्यांची सी.बी.आय. चौकशी करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी द्रमुक पक्षाने बुधवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याकडे केली.
विद्यासागर राव यांच्याकडे सध्या तामीळनाडूचा अतिरिक्त कार्यभार आहे. आज द्रमुकचे खासदार आर. एस. भारती, टीकेएस एलांगोवन आणि त्रुची एन. सिवा यांनी राज्यपालांची मुंबईत राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना द्रमुकचे नेते स्टॅलियन यांचे निवेदनही दिले.
या निवेदनात स्टॅलियन यांनी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुले रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री पलानीसामी व त्यांचे सहकारी आरोग्यमंत्री विजय भास्कर यांनी सुमारे १०० कोटी रूपये वाटल्याचा आरोप केला आहे. साड्या, मोबाईल रिचार्ज, लुंग्या, दुधाची कूपन, दिवे यांचेही वाटप झाले. अण्णाद्रमुकच्या दोन गटांपैकी शशिकला गटाचे उमेदवार व शशिकलाचे भाचे दिनकरन यांच्याविरूद्ध फेराची केस चालू आहे. काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाने विजय भास्कर यांच्या घरावर तसेच चेन्नईत २१ ठिकाणी व चन्नईबाहेर ११ ठिकाणी छापे घातले. विजय भास्कर यांचे विश्वासू सरथ कुमार, समथुवा मक्कल काटची, माजी खासदार राजेंद्रन, डॉ. गीता लक्ष्मी यांचीही चौकशी केली. त्यामुळे या सरकारच्या भ३ष्टाचाराची चौकशी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.