नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने मोठी रक्कम बाळगण्यास मनाई आहे. त्यामुळेच देशभरात वाहने तपासली जात आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या वाहन ताफ्यातून १.८० कोटी जप्त करण्यात आल्याचे गंभीर रारोप काँग्रेसकडून करण्यात आले आहेत. बुधवारी नवी दिल्लीत काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आरोप केले. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंबंधीचा व्हिडीओ दाखवित आरोप केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत चौकीदाराची चोरी पकडण्यात आली, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेशात प्रचारसभा आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचा वापर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठी करण्यात येणार होता, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांच्याकडून करण्यात आला आहे.