पुणे : सरकारला अडचणीत आणणारे विधान केल्याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असे विधान खासदार संजय काकडे यांनी केले आहे. यामुळे काकडे विरुध्द बापट अशी पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.
कोणते सरकार येईल हे सांगता येत नाही
पुढील वर्षी कोणते सरकार येईल हे सांगता येत नाही, काय हेव ते आत्ताच मागा, असे वक्तव्य बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले होते. याहीपेक्षा पुढे जावून ते असेही म्हणाले होते की, आताच काय ती कामे सांगा. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विशेषत: भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. विरोधीपक्षांना एक आयतेच कोलीत हाती मिळाले आहेे. खरे बोलल्याबद्दल बापट यांचे अभिनंदन करायला हवे, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. तर काकडे यांनी आता मुख्यमंत्रांकडे बोट दाखवून बापट यांचा वचपा काढला आहे.
काकडेंनी साधला डाव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार नाही, असा अंदाज काकडे यांनी व्यक्त केला होता. त्यावेळीस बापट गटाने काकडे यांना अडचणीत आणले होते. वरिष्ठ पातळीवरून काकडे यांना विचारणा झाली. त्यानंतर काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वारेमाप स्तुती करून अडकलेला हात सोडवून घेतला होता. आता बापट यांच्या विधानानंतर काकडे यांनी डाव साधला आहे. बापट यांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे म्हणत फडणवीस यांच्यापर्यंत विषय नेण्याचा प्रयत्न खासदार काकडे यांनी केला आहे.
दिलजमाई झालीच नाही
मध्यंतरी एका वृत्तपत्राने बापट आणि काकडे यांच्यात दिलजमाई झाली, अशा बातम्या दिल्या होत्या. त्या काकडेंच्या या विधानाने फोल ठरल्या आहेत. यापूर्वी एकदा बापट आपल्या विधानाने चर्चेचा विषय झाले होते. एका युवकांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पिकल्या पानाचा उल्लेख केला होता. मात्र यावेळचे विधान थेट राजकीय असल्याने त्याचे पडसाद अजूनही उमटत राहाणार आहेत, असा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवित आहेत.