नवी दिल्ली । देशातील काही भागात कथित गोरक्षकांचा उच्छाद वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप व या पक्षाला मानणार्या काही संघटनांना जबाबदार धरत टीका सुरु झाली. याची दखल घेत व उत्तर प्रदेशात गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारांमुळे वातावरण ढवळून निघाले असल्याने, जो कोणी कायदा हातात घेईल त्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये यापुढे कायद्याची पायमल्ली खपवून घेतली जाणार नाही, लोकांनी गोरक्षेच्या नावाखाली कायदा हातात घेता कामा नये, अशी टीप्पणीही त्यांनी केली.
मोदींच्या इशार्याचा परिणाम नाही
अमेरिका दौर्यावरुन परतल्यानंतर लगेचच गोरक्षणाच्या नावाखाली मनुष्यहत्या करणे मुळीच स्वीकारार्ह नसून, अशा रीतीने कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशा शब्दांत मोदी यांनी स्वयंघोषित गोरक्षकांना समज दिली. मात्र त्यानंतर काही तासातच झारखंडमधील रामगड जिल्ह्यत असगर अन्सारी या तरुणाची गोमांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने हत्या केली. असगर हा त्याच्या गाडीतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून बेभान जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा अंत झाला. मोदी यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम स्वयंघोषित गोरक्षकांवर झालेला नसल्याचे झारखंडमधील एका घटनेने स्पष्ट झाले.
माझ्या मते सरकार स्वत:चे काम व्यवस्थितपणे करत आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही. राज्यातील कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर कारवाई होणार नाही, याची हमी मी तुम्हाला देतो. मात्र, त्याचवेळी सरकार कोणत्याही माफिया किंवा गुन्हेगाराला सोडणार नाही.
– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश