मुख्यमंत्री शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12 ऑगस्टला पिंपरी-चिंचवड दौर्‍यावर येणार आहेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर ते पहिल्यांदाच शहरात येत आहेत. सत्ताधारी भाजपची पाच महिन्यांची कारकीर्द विकासकामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गाजली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळाचे या दौर्‍याकडे लक्ष लागले आहे.

उड्डाणपूलाचे भूमिपूजन
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पालिकेच्यावतीने ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 90 कोटी 53 लाख खर्च येणार आहे. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आणि औंध-रावेत रस्त्यावरील वाकड फाटा येथील ग्रेड सेपरटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच भोसरी, एमआयीडीसी पोलिस ठाण्याची नवीन इमारत मोशी, प्राधिकरणाच्या हद्दीत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
महापालिकेत पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. यामध्ये फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. मात्र, सत्ता मिळाल्यानंतरची कारकीर्द विकासकामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच जास्त चर्चेत राहिली असल्याचे दिसून येत आहे. पालिकेतील टक्केवारीची तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार गेली होती. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीदेखील होती. त्याचबरोबर रिंगरोडचा प्रश्न गेल्या दोन महिन्यांपासून गाजत आहे. बाधित नागरिकांनी रिंगरोडला विरोध केला आहे. याबाबत फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.