मुंबई: राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची अतिरिक्त जबाबदारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. ना. महाजन या विभागाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. आरोग्याच्या क्षेत्रात राज्यभरातील रुग्णांना या विभागामार्फत मोठ्या प्रमाणात मदत मिळाली आहे. गिरीश महाजन यांनी राज्यभरात महाआरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करून नवा पॅटर्न निर्माण केला आहे. सोबतच जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निवारणासाठी ३.३० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला होता, . जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केलेल्या आवाहनानंतर शासकीय आदेशाची वाट न पाहता स्वत:हून दुष्काळ निवारणासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची उल्लेखनीय कामगिरी जलसंपदा विभागाने केली होती. यामुळे महाजन यांच्याकडे या विभागाची जबाबदारी दिली गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी ते या विभागाची धुरा आपल्या हाती घेतील.